– देसाईगंज येथे उज्वल भारत, उज्वल भविष्य उर्जा महोत्सवाचे आयोजन
– दुर्गम अशा गडचिरोलीत महावितरणने भविष्यातही योगदान द्यावे – धनाजी पाटील
The गडविश्व
गडचिरोली, ३० जुलै : जिल्हयातील देसाईगंज येथे उज्वल भारत, उज्वल भविष्य उर्जा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी महावितरणने दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली व शासनाच्या योजनांची फलनिष्पत्ती मांडली. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पूर्ण होण्याचे निमित्ताने अमृत महोत्सव प्रत्येक विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लोकापर्यंत पोहोचविले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांमधूनच आज गडचिरोलीत घराघरात वीज पोहचली आहे. उन्नतीचा आधार स्तंभ वीज असून गावपातळीवर सर्वसामान्यांना लाभ होतो की नाही हेही पाहिले पाहिजे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागात कार्य केले पाहिजे. आजच्या काळात सौर ऊर्जा अतिशय महत्वाची असून सौर ऊर्जामुळे सिंचनाची सुविधा वाढली आहे असे ते यावेळी म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि जिल्हा प्रशासनामार्फत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ पॉवर@2047 या उर्जा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन देसाईगंज येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार कृष्णा गजबे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरीक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, पॉवर फायनांस कॉर्पोरेयानचे महाव्यवस्थापक अरूण श्रीवास्तव, उपवनसंरक्षक धनंजय वायवासे, अधीक्षक अभीयंता अवघड, अधीक्षक अभियंता रविंद्र गाडगे, सुहास म्हेत्रे, कार्यकारी अभियंता डोंगरवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दुर्गम अशा गडचिरोलीत महावितरणने भविष्यातही योगदान द्यावे – धनाजी पाटील
अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी शासनाच्या विविध योजनेअंतर्गत गावागावांत विद्युतीकरण केल्याबाबतची माहिती सांगितली. मागील वर्षात जिल्हा नियोजन व आदीवासी उपयोजनेतून २३४ गावे, वाड्या पाड्यांवर ५७ कोटी रूपये खर्चून वीज जोडणी करण्यात आली. वीज वितरणचे कर्मचारी दुर्गम भागात सुद्धा मोठया जिकरीने कार्य करीत असून अतिवृष्टीमध्येही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. जिथे वीज नाही तीथेही वीज पोहोचविण्याचे काम वीज वितरणचे कर्मचारी काम करीत आहे. आपल्या गडचिरेाली जिल्ह्यात अति दुर्गम भागात सुद्धा विद्युतीकरण करण्याचे कार्य वीज वितरणचे कर्मचारी करीत आहेत. भविष्यातही अशाच कामाची अशा त्यांच्या कडून असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
३० जुलै रोजी प्रधानमंत्री साधणार जिल्हयातील लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद
गडचिरोलीसह राज्यातील इतर चार अशा पाच जिल्हयांची निवड उज्वल भारत, उज्वल भविष्य उर्जा महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात करण्यात आली आहे. या कार्यक्रमात ऑनलाईन स्वरूपात दिल्ली येथून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रम गडचिरोली येथे नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शनिवारी संपन्न होणार आहे.