– भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
The गडविश्व
गडचिरोली, ५ सप्टेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची निर्मिती लाखो रुपये खर्चून करण्यात आली होती. सदर अतिदक्षता विभागाचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येवून दोन वर्षे उलटल्यानंतरही फायर ऑडिटच्या नावाखाली सदर अत्याधुनिक अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले नव्हते याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताच कुलूपबंद अत्याधुनिक अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यात आले आहे.
सदर अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी १६ जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती, मात्र ते रुग्णांकरीता सुरू करण्यात आले नव्हते.
याबाबत आमदार भाई जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करुन दोषी अधिकाऱ्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांची चौकशी करण्याची मागणी करताच कारवाईच्या भितीने तातडीने सदरचे अत्याधुनिक अतिदक्षता विभाग रुग्णांसाठी सुरू करुन कारवाई होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने केला असून वरिष्ठांना उत्तरादाखल पत्रव्यवहार करून तळमजल्यावरील हा अतिदक्षता विभाग सुरुच असल्याची सारवासारव अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्फत करण्यात आली आहे. सदर सुविधा रुग्णांना मिळणे सुरू झाल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील आणि महिला नेत्या जयश्री वेळदा यांचे आभार मानले आहेत.
गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग तयार होवूनही ते सुरू होण्यासाठी दोन वर्षे का लागली आहेत यासह विविध मुद्द्यांबाबत यानिमित्ताने वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यासाठी आमदार भाई जयंत पाटील पाठपुरावा करणार असून यात अनियमितपणा होण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर लवकरच मोठी कारवाई होणार असल्याची अपेक्षा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी व्यक्त केली आहे.