– चिमूर तालुक्यातील सोनेगाव बेगडेच्या शिरपेचात मानाचा तुरा
The गडविश्व
चिमूर : तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगाव बेगडे येथील पूजा भास्कर ढोणे ह्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे. आयोगाच्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये पूजाने ४८४ वा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या निवडीने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पूजाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर सोबतच शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा होत आहे.
पूजा यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण झाले. त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण नेहरू विद्यालय चिमूर व लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथून पूर्ण केले. यादरम्यान त्या आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे निवासी राहत होत्या. एमएचे शिक्षण पूर्ण करत असताना २०१८ मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जळगाव गाठले. सलग एक वर्ष अभ्यास करून आयोगाच्या परीक्षेची अंतिम फेरी पूर्ण केली. या परीक्षेची मुख्य परीक्षा असतानाच वडील पक्षाघाताने आजारी पडले होते. परंतु नियतीपुढे न डगमगता अभ्यास चालूच ठेवला. गेल्या वर्षी २०२१ मध्ये पूजाच्या वडीलाचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यापश्चात कुटुंबामध्ये आईसोबत चार बहिणी व एक भाऊ यांचा समावेश आहे. त्यांच्या जीवनाच्या या संघर्षमय प्रवासात पूजा यांनी आशेचा किरण दाखवला असून त्यांच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पूजा यांनी पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी मिळवलेली असून यानंतर गावातील मुलांना इच्छित ध्येयात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्याचा त्यांनी मानस व्यक्त करून दाखवला. त्यांच्या या ध्येयपूर्तीत आईवडील, नातेवाईक, शिक्षकवृंद व मित्रमंडळी यांनी मोलाचा वाटा उचलला.
‘स्वतःला आवडलेले ध्येय निश्चित झाले आणि ते मिळवण्यासाठी परिश्रम घेण्याची पूर्ण तयारी असली तर परिस्थिती कधीही यशाच्या आड येत नाही.’
– पूजा ढोणे