– दसरा- विजयादशमी सण विशेष
दसरा हा सण हिंदू बांधवांमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. या सणानिमित्त नवीन कपडेलत्ते खरेदी केले जातात. तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांची तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने, शस्त्रे व औजारे स्वच्छ करून पूजतात आणि त्यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जात असतात. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खुप जुनी आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. प्रभुरामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरिता यावेळी गेले होते, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस आहे. याविषयीची आणखीन एक दंतकथा आहे. ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत आले. त्यांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. ती काढून त्यांची पूजा केली व परत सोबत घेतली, अशी कथा आढळून येते. यामुळे विजयादशमीला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करून त्याला औक्षण केले जाते. अशाप्रकारे दसरा हा सण भारतात विविध ठिकाणी मिठाई वाटून व एकमेकांना शुभेच्छा देऊन मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा केला जातो.
दसरा किंवा विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी होय. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीच्या नवरात्री साजऱ्या होतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. शेतकरी बांधव दसरा या सणास शेतीविषयक लोकोत्सव म्हणून साजरा करतात. कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे आपला अन्नदाता हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. ग्रामीण भागातील लोक हा उत्सव साजरा करताना शेतातील धान्याचा तुरा- लोंब आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतही प्रचलित आहे. काही लोक तर टोपीवर लावतात. दसरा या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात, त्या वृक्षाला अस्मंतक असे म्हणतात. या वृक्षाच्या पानांमध्ये औषधीगुण आहे. तो म्हणजे पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा होय. नऊ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासुर राक्षसाचा यादिवशी वध केला, असे म्हटले जाते. तर रामानेही याच दिवशी रावण महाराजाचा वध केल्याचे इतिहासातून कळते. म्हणून वाईट वृत्तीचे दहन या दिवशी करावे, असे मानले जाते. तत्वज्ञानी, महापंडित, भगवद्भक्त रावण महाराजांच्या पुतळ्याचे दहन जाणत्यांनी करणे कदापिही उचित ठरत नाही. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेल्या विजया दशमीला शुभ कार्य करतात. नवीन वाहने, वस्तू, कपडे, सोने आदींची खरेदी या दिवशी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला. पेशवाईमध्ये सुद्धा या सणाचे फार महत्त्व होते. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. यालाच सीमा उल्लंघन- सीमोल्लंघन असे म्हणतात. विजयादशमी खास विजय मिळवून देणारा दिवस आहे, असे मानले जाते.
या दिवशी घरोघरी पूजाअर्चना करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूचे फुले आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवींना हार लावल्या जातो. व संध्याकाळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन त्यांच्या कुटुंबाला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा, असे म्हटले जाते. आणखी एक महत्त्व म्हणजे साडेतीन मुहूर्तातील एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या चांगल्या गोष्टीचा प्रभाव केला जातो, प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने विजय मिळविला जातो. शत्रूवर पराक्रमाने तसेच वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळविला जातो. तसेच कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रितपणे देवीला आपल्या विजयाची कामना करतात व जीवनात सतत कायम कृपादृष्टी राहण्यासाठी आशीर्वाद मागतात. दसरा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. दसरा सणाच्या दिवशी घराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. संध्याकाळी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना द्यायची पद्धत आहे. आपट्याची पाने देण्यासाठी एकमेकांच्या घरी सुद्धा काही लोक जातात व त्यांना शुभेच्छा देतात. ही एक जुनी प्रथा आहे आणि आजही ती कायम आहे. या दिवशी विविध पदार्थसुद्धा घरी केले जातात. म्हणून म्हणतात, “दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा!” विजयादशमी- दसरा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी स्त्रिया सोने खरेदी करतात. सर्व कुटुंबातील मंडळी एकत्र येतात व देवीच्या दर्शनाला जातात. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या, असे सांगावेसे वाटते.
यानिमित्ताने सोने लुटण्याची एक प्रथा आहे, त्याविषयी एक कथा आहे. ती म्हणजे फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वरतंतू नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खुप शिष्य येत असत. बरेच शिष्य अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत असत. या ऋषीकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले, की तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय घेणार? मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? तुम्ही मागाल ती गुरुदक्षिणा मी देईल. मग त्या ऋषीने याची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. परंतु ऋषीने कौत्सला प्रत्येक विद्याबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे चौदा विद्यांचे ज्ञान दिल्यामुळे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणावयास सांगितले. ते ऐकून कौत्स गांगरला गेला. तो रघुराजांकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजीत यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरीसुद्धा राजाने कळसाकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांच्या आकाराची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू या ऋषीकडे गेला आणि त्या ऋषीला गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्या घेण्यास नकार दिला. चौदा कोटी सुवर्णमुद्रा परत नेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितले. अनेकांनी त्या वृक्षांची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याची नाणी लुटण्याची प्रथा सुरू झाली, असे म्हटले जाते.
!! विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा !!
संकलन व शब्दांकन
श्री एन. कृष्णकुमार, से. नि. अध्यापक.
द्वारा- श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ,
रामनगर, गडचिरोली मोबा. ७७७५०४१०८६.