– मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या हस्ते चे उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील पहिलाच भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प ‘ तारमुक्त शोधग्राम ‘ चे उद्घाटन चंद्रपुर झोन चे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या हस्ते २२ एप्रिल रोजी सर्चमध्ये करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शोधग्राम परिसरातील झाडे विजेच्या तारांवर कोसळून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. या दरम्यान शोधग्राम मधील वीजवाहक तारांचे मोठे नुकसान होत होते. ही यंत्रणा पुन्हा सुरळीत उभी करताना शोधग्राम तसेच महावितरण विभागाची मोठी दमछाक होत होती. ही समस्या सोडविण्यासाठी सर्च प्रशासनाने तारमुक्त शोधग्राम हा अनोखा प्रयोग हाती घेतला. अगदी कमी कालावधीत हे काम महावितरण विभाग आणि कंत्रांटदार यांच्या मदतीने पूर्णत्वास आले. याचे रितसर उद्घाटन चंद्रपुर झोन चे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रकल्पामुळे वीजेच्या तारा तुटण्याचा धोका आता शोधग्राम रहिवासीयांना राहणार नाही व सर्च दवाखान्याला आता २४ तास अखंडित वीज पुरवठा चालू राहील असा विश्वास निर्माण झाला आहे. याप्रसंगी प्रमूख अतिथि तसेच सर्चचे संचालक डॉ.अभय बंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जंगलावर पहिला अधिकार झाडांचा, दूसरा पशूपक्ष्यांचा आणि शेवटी मानवाचा असतो. वीजेच्या लटकत्या तारांमुळे अनेक वेळा झाडांच्या फांद्या तोडाव्या लागत होत्या त्यामुळे शोधग्राम मध्ये झाडांची मुक्तपणे वाढ होत नसायची. या प्रकल्पामुळे आपण आता तारमुक्त आणि भारमुक्त सुद्धा झालो अशी भावना व्यक्त करून डॉ. अभय बंग यांनी महावितरण आणि कंत्रांटदार सुमेरसिंग पवार यांचे आभार मानले. “ तारमुक्त शोधग्राम” व्हावे याकरिता शोधग्राम मधील बांधकाम विभागाचे प्रमुख भुवन केळझरकर व नेताजी ठाकरे यांनी अधिक परिश्रम घेतले आणि या कामासाठी महावितरण ने वेळोवेळी सहकार्य त्यांना केले. या संपूर्ण प्रकल्पाचे डिझाईन पराग पांढरीपांडे व रहांगडाले यांनी केले. याप्रसंगी सुनील देशपांडे, सुमेरसिंग पवार ,योगेश यांचा सत्कार पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केला व इतर मान्यवरांचा सत्कार सहसंचालक तुषार खोरगडे व संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी ज्ञानेश्वर आरोटे यांनी केला. या कार्यक्रमाचे संचालन भुवन केळझरकर यांनी केले. तसेच या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी गडचिरोली सर्कलचे अधीक्षक अभियंता गाडगे, गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता डोंगरवार, धानोरा उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता शेंडे तसेच योगेश आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व सर्च कार्यकर्ते व शोधग्राम मधील रहिवासी उपस्थित होते.