– गोंडवाना विद्यापीठात ध्वजारोहण संपन्न
The गडविश्व
गडचिरोली , १३ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोंडवाना विद्यापीठात आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वा. ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत त्या निमित्ताने १३ ते १५ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा या अभियानाअतंर्गत ध्वजारोहण करून आपण आपल्या देशभक्तीचा परिचय देतोय. समाज जेव्हा अशी एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा त्यामागे निश्चित काहीतरी भूमिका असते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी क्रांतिकारकांनी होतात्म पत्करले तसेच सीमेवर जे लोक शहीद होतात त्यांना खऱ्या अर्थाने सलामी द्यायचीअसेल तर दैनंदिन जीवनामध्ये काय करतोय ते महत्त्वाचे आहे. जे काम आपल्या वाट्याला आले आहे त्याच्याशी आपण किती प्रामाणिक राहतो. या तीन दिवसांमध्ये आपण कुठल्यातरी तीन मुल्यांचा विचार करायला हवाय. ती चांगली मूल्ये आपण आचारणात आणून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल याचा विचार करायला हवाय. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. हर घर तिरंगा अभियानात प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे तसेच उद्या १४ ऑगस्ट ला होणाऱ्या रांगोळी स्पर्धा तसेच निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. शाम खंडारे यांच्यासह सर्व संविधानिक अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.