The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील सोमनूर येथील विक्रेत्यांचा सहा ड्रम गुळाचा सडवा व २० लिटर दारू नष्ट केल्याची कृती गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
असरअल्ली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोमनूर येथे अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, गावातील तीन मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरु केला होता. यामुळे परिसरातील मद्यपी या गावात दारू पिण्यासाठी येत होते. अशातच गावातील अवैध दारूविक्रेत्यांविरोध मोहीम हाती घेण्याचा निर्णय गाव संघटनेच्या महिलांनी घेतला. एक विक्रेता घरी हातभट्टी लावून दारू गाळत असल्याची माहिती प्राप्त होताच मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्त कृती करीत दारूविक्रेत्याच्या घराची पाहणी केली. दरम्यान, सहा ड्रम गुळाचा सडवा व २० लिटर दारू मिळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी देण्यात आली.