– विनोद कांबळींनी स्वीकारली महाराष्ट्रातील युवा उद्योजकाची ‘ऑफर’
The गडविश्व
मुंबई : आर्थिक परिस्थितीमुळे हालाखीचे जीवन जगत असलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी अखेर संदीप थोरात या युवा उद्योजकाची ऑफर स्वीकारली आहे. अहमदनगरचे युवा उद्योजक संदीप थोरात यांनी स्वत: ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे थोरात यांनी त्यांच्या सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीच्या मानद संचालकपदाची धूरा कांबळींवर सोपविली आहे.
सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी आज गुरूवारी मुंबई येथे विनोद कांबळींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मानवतेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी आलेल्या या ऑफरचा विनोद कांबळी यांनी आनंदाने स्वीकार केला. माध्यमांवर झळकलेल्या बातम्यांमुळे व्यतीत होऊन थेट एक लाखाच्या पगाराची ऑफर देणाऱ्या संदीप थोरात यांचे कांबळींनी आभारही मानले. कांबळींनी ऑफर स्वीकारताच संदीप थोरात यांनी त्यांना एक लाख रुपयांचे धनादेश सुद्धा प्रदान केले.
काही दिवसांपूर्वी आपल्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीबाबत केलेल्या वक्तव्याचा विनोद कांबळींचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांचा हा व्हिडिओ पाहून व्यतित झालेल्या सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लिमिटेडचे चेअरमन संदीप थोरात यांनी कांबळींना त्यांच्या मुंबई येथील ब्रँचमध्ये एक लाख रूपये प्रति महिना पगाराच्या नोकरीची ऑफर दिली होती. याची माध्यमांवरही चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र थोरात यांनी केवळ ऑफर देऊन स्वस्थ न बसता तिनदा मुंबई गाठून कांबळींच्या घरी भेट देऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्नही केला. यानंतर फोनवर झालेल्या संवादानंतर अखेर विनोद कांबळी आणि संदीप थोरात यांची मुंबईत कांबळींच्या घरी भेट झाली. या भेटीत थोरात यांनी कांबळींनी देशाप्रति दिलेल्या योगदानाचे विशेषत्वाने उल्लेख केला. कांबळींनीही थोरातांचे आभार मानून त्यांच्या ऑफरचा आनंदाने स्वीकार केला. विशेष म्हणजे एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात आपल्या खेळाने दबदबा निर्माण करणारे कांबळी आता या ऑफरमुळे सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स या कंपनीच्या मानद संचालक पदाच्या नव्या भूमिकेत दिसणार आहेत, हे नक्की़.