इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सी स्थापना विशेष
संस्थेची सर्वसाधारण व्यवस्था पाहण्याकरिता एक सर्वसाधारण मंडळ आहे. या मंडळात सर्व सभासद राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. या मंडळाची बैठक साधारणत: वर्षातून एकदाच भरते परंतु विशेष काम असल्यास आणखी केव्हाही भरविता येते. वार्षिक सभेमध्ये पुढील वर्षाचा कार्यक्रम, खर्चाचे अंदाजपत्रक व सभासदांसंबंधीचे धोरण ठरविले जाते. संयुक्त राष्ट्राकडे पाठवावयाचा वार्षिक अहवाल संयुक्त राष्ट्रे व इतर संस्थांबरोबर केलेल्या करारांसंबंधी विचारविनिमय करून त्यांना मान्यता देण्यात येते. हे मंडळ आपल्यातूनच एक नियंत्रक मंडळ निवडते. हे नियंत्रक मंडळ एका संचालकाची निवड करते. या निवडीला सर्वसाधारण मंडळाची मान्यता असावी लागते. संचालकाची नेमणूक चार वर्षांकरिता असते. हा संचालक संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करतो व त्यांच्या सर्व कामावरही लक्ष ठेवतो. ही सार्वजनिक आरोग्य व इतर सर्व अविनाशक उद्योगांच्या उत्कर्षाकरिता अणुऊर्जेसंबंधी संशोधन करून अणुऊर्जेचा वापर करण्यास उत्तेजन देणारी व सर्व प्रकारची मदत करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था दि.२९ जुलै १९५७ रोजी व्हिएन्ना येथे सुरू झाली. भारत आणि जगातील बहुतेक सर्व राष्ट्रे या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेला संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेली आहे.
या संस्थेतर्फे सीबर्सडॉर्फ व व्हिएन्ना येथे दोन मोठ्या प्रयोगशाळा चालविण्यात येतात. याशिवाय दोन वहनसुलभ स्वरूपाच्या प्रयोगशाळा असून त्या बाहेरगावच्या कामासाठी वापरता येतात. मुख्य प्रयोगशाळेमध्ये भौतिकी, रसायनशास्त्र, कृषिविज्ञान, वैद्यक, पाणीपुरवठा, समस्थानिक- अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेला त्या मूलद्रव्याचा प्रकार, संरक्षक योजना अशा मुख्य शाखा आहेत. या प्रयोगशाळेत सर्व सभासद राष्ट्रांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. अरब राष्ट्रांकरिता कैरो येथे एक स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते व ट्रिएस्ट येथे जागतिक स्वरूपाचे एक खास केंद्र असून तेथे सैद्धांतिक भौतिकीचा विशेष अभ्यास करण्याची सोय केलेली आहे. मोनॅको येथील फ्रेंच सरकारच्या मदतीने चालणाऱ्या सागरी संस्थेमध्ये या संस्थेच्या वतीने सागरी जीवशास्त्रासंबंधी संशोधन करण्यासाठी एक नवीन प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. व्हिएन्ना येथील प्रयोगशाळेत नवीन अणुकेंद्रीय विक्रियकांचे- अणुभट्ट्यांचे अभिकल्प- आराखडे करण्यात येतात. सभासद राष्ट्रांत उभारावयाच्या अणुकेंद्रीय विक्रियकांच्या प्रकल्पांचे पूर्वपरीक्षण करण्यात येते व ते प्रकल्प समाधानकारक वाटले, तर त्यांना लागणारे साहित्य पुरविण्यात येते. संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने संरक्षक साहित्य आणि कार्यपद्धती यांचे मानकीकरण- मार्गदर्शक प्रमाणभूत नमुना ठरविणे करण्यात येते. अशा साहित्याचा मुख्य उद्देश म्हणजे अणुशक्तीचा उपयोग करणाऱ्या कोणाही कर्मचाऱ्यास शारीरिक इजा होऊ नये व त्याच्या जीवास कसलाही धोका असून नये हा असतो. संस्थेतर्फे संरक्षणाच्या दृष्टीने संशयित वस्तूंची तपासणी करण्यात येते व तपासणी करण्याच्या साहित्याचे उत्पादनही करण्यात येते.
वैद्यक विभागात चिकित्सेकरिता किरणोत्सर्गी न्यूक्लाइडांचा- अल्पकाल टिकणाऱ्या किरणोत्सर्गी अणूंचा कसा उपयोग करता येईल? यासंबंधी संशोधन करण्यात येते. निरनिराळ्या देशांतील परिस्थितीप्रमाणे पांडुरोग- अॅनिमिया, गलगंड, परजीवीशास्त्र- दुसऱ्यांवर उपजिविका करणाऱ्या सजीवांसंबंधीचे शास्त्र, अपपोषण- पोषणास आवश्यक असणाऱ्या द्रव्यांच्या अभावामुळे निर्माण होणारी स्थिती, अशा विविध विषयांसंबंधी प्रयोग करण्यात येतात. पाणीपुरवठा विभागात किरणोत्सर्गी समस्थानिकांचा उपयोग करून पाणीपुरवठा सुधारण्यासाठी निरनिराळ्या देशांतील परिस्थितीप्रमाणे अनेक प्रयोग करण्यात येतात व सभासद राष्ट्रांतील योजनांना मदत करण्यात येते. कृषिविज्ञान शाखेत भात व मका या धान्यांच्या बाबतीत खतांचे शोषण कितपत होते यासंबंधी संशोधन चालते. याशिवाय वनस्पती खाणाऱ्या किडींचा नाश करण्याच्या पद्धतींसंबंधी संशोधन चालते. किरणोत्सर्गी- कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या समस्थानिकांच्या मदतीने वनस्पतींची वाढ, नव्या जातींचे उत्पादन, रोगनिवारण वगैरे विषयांवरही प्रयोग करण्यात येतात. खाद्यवस्तूंवर किरणोत्सर्गाची प्रक्रिया करून त्या टिकविण्यासंबंधी आणि त्यांतील विषारी द्रव्यांचा नाश करण्यासंबंधी संशोधन करण्यात येते. इतर विभागांत किरणोत्सर्गी द्रव्ये हवेत मिसळल्याने किंवा अन्नात गेल्याने मनुष्याला कसा अपाय होऊ शकतो? यासंबंधी सतत अभ्यास चालू असतो. किरणोत्सर्गी द्रव्ये दुसऱ्या ठिकाणी नेताना त्यांच्यापासून इतर लोकांना उपद्रव झाल्यास कोणते कायदेशीर उपाय योजावेत? यासंबंधी व्हिएन्ना येथे मुद्दाम भरविलेल्या परिषदेने केलेल्या ठरावास संस्थेतर्फे अधिकृत मान्यता देण्यात आली. या ठरावात जमिनीवरचे अणुकेंद्रीय विक्रियक व जहाजात बसविलेल्या अणुकेंद्रीय विक्रियकांचाही विचार केलेला आहे. किरणोत्सर्गी द्रव्यांची ने-आण करण्याच्या पद्धती व निरुपयोगी झालेल्या द्रव्यांची विल्हेवाट लावण्याच्या विशेष पद्धती यांसंबंधी संस्थेने बऱ्याच पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. संस्थेतर्फे किरणोत्सर्गी द्रव्यांचे व मापन पद्धतींचे मानकीकरण, मापक उपकरणांची तपासणी, संशयित द्रव्यांची तपासणी अशी विविध कामे सतत करण्यात येतात.
या संस्थेच्या मुख्य उद्देशाप्रमाणे ही संस्था सभासद राष्ट्रांच्या गरजेप्रमाणे त्यांना अणुकेंद्रीय विक्रियकांची सामग्री, तांत्रिक माहिती व योग्य अधिकारी माणसे पुरविण्याचे काम करते. याकरिता शक्य असेल त्या राष्ट्रांनीही संस्थेला उपयोगी पडणारी किरणोत्सर्गी द्रव्ये पुरवावी, अशी अपेक्षा असते. अशा द्रव्यांची किंमत संस्थेने ठरविलेल्या दराप्रमाणे देण्यात येते. संस्थेकडे येणाऱ्या सर्व द्रव्यांची नीट साठवण करून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संस्थेवर असते. या संस्थेकडे येणाऱ्या मालामध्ये युरेनियम, रेडियम अशा अनेक दुर्मिळ व अतिमौल्यवान धातूंचा समावेश होत असल्याने त्या धातू कोठारातून अनधिकृत मार्गाने बाहेर जाण्याची पुष्कळ शक्यता असते. याकरिता संस्थेला विशेष काळजी घ्यावी लागते. अशी मौल्यवान द्रव्ये जगातील निरनिराळ्या भागांत विभागून ठेवतात व कोणत्याही एका ठिकाणी मोठा साठा होणार नाही, अशी खबरदारी घेतात. कोणत्याही सभासद राष्ट्राला अणुकेंद्रीय विक्रियकासारखा नवा प्रकल्प सुरू करावयाचा असला, तर या संस्थेकडे युरेनियम सारख्या दुर्मिळ द्रव्याची मागणी करता येते. अशी मागणी आली म्हणजे ही संस्था त्या प्रकल्पाची सर्व माहिती मिळविण्याकरिता त्या राष्ट्रात आपले तंत्रज्ञ पाठविते. तंत्रज्ञांना सर्व माहिती मिळाल्यावर तो प्रकल्प समाधानकारक वाटल्यास ही संस्था त्या प्रकल्पाकरिता लागणारे सर्व साहित्य पुरविते. जरूर असल्यास तांत्रिक माहिती व सल्लागार मंडळही पुरविते. अशा वेळी संस्थेला काही विशेष हक्क असतात व काही जबाबदारीही असते. अशा नव्या प्रकल्पात उभारावयाच्या अणुकेंद्रीय विक्रियकांच्या अभिकल्पाचे परीक्षण करून व त्याबरोबरच्या इतर सरंक्षक योजनांची पाहणी करून त्यांचा उपयोग विनाशक कार्याकडे होऊ शकणार नाही व त्यापासून कर्मचाऱ्यांना कसलीही इजा होणार नाही याबद्दल खात्री करून घ्यावी लागते. याकरिता संस्थेला त्या राष्ट्रात आपले निरीक्षक पाठविण्याचा हक्क असतो. अशा निरीक्षकांना त्या राष्ट्रात कोणाही संबंधित व्यक्तीची मुलाखत घेण्यास त्या राष्ट्राने परवानगी द्यावी लागते. याशिवाय संस्थेला आपले कार्य पूर्ण करण्यासाठी त्या राष्ट्रामध्ये काही विशेष कायदेशीर हक्क मिळतात आणि विशेष सवलतीही मिळतात. या संबंधात काही वाद निर्माण झाला किंवा तो आपापसातील तडजोडीने मिटविता आला नाही, तर तो वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे निर्णयासाठी पाठविला जातो.
सभासदांच्या उपयोगासाठी संस्थेचे एक मोठे ग्रंथालय आहे. त्यात जवळजवळ एक लाख ग्रंथांचा संग्रह उपलब्ध आहे. याशिवाय तेथे निरनिराळ्या विषयांवरील तीनशे चित्रपटांचा संग्रह उपलब्ध आहे. या संस्थेतर्फे सर्व संशोधनासंबंधी अहवाल प्रसिद्ध करण्यात येतात. अॅटॉमिक एनर्जी हे नियतकालिक प्रसिद्ध करण्यात येते आणि इतर विविध कार्यांसंबंधी अनेक पुस्तके प्रसिद्ध करण्यात येतात, हे उल्लेखनीय!
!! The गडविश्व परिवारातर्फे इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सी स्थापना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
श्री एन. कृष्णकुमार, से.नि.अध्यापक.
पोटेगावरोड, गडचिरोली.
भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.