– सावली पंचायत समितीच्या निर्णयाचे केले स्वागत
The गडविश्व
सावली : अनेक वर्षांपासून जुने जन्म – मृत्यूचे रेकॉर्ड पंचायत समितीला असल्यामुळे गावातून तालुक्यात येऊन दाखला मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत होती. म्हणून पंचायत समितीने सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायतला पाठविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्रामपंचायत मधून दाखले मिळणे सुरू आहे. यामुळे तालुक्यातील जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जुने जन्म – मृत्यू रेकॉर्ड पंचायत समितीला जमा करण्यात आले होते. सावली तालुक्यातील नागरिकांना जुने जन्म – मृत्यू दाखले काढायचे असल्यास सावली येथील पंचायत समिती कार्यालयात यावे लागते होते. आठवड्यातून दोन दिवस दाखले देण्याचे ठरले होते मात्र त्या दिवशी अचानक अधिकारी बैठकीसाठी किंवा कामासाठी गेल्यास नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागत होते, अनेकदा रेकॉर्ड नसल्यास दाखले उपलब्ध नसल्याचा दाखला घेऊन परत जावे लागत असे. यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत असे. ही बाब पंचायत समिती पदाधिकारी यांच्या लक्षात आली असता मासिक सभेत जन्म मृत्यू रेकॉर्ड ग्रामपंचायत ला परत करण्याचा ठराव घेण्यात आला. हा ठराव रविंद्र बोलीवार यांनी मांडला व सर्वानुमते सभापती विजय कोरेवार, सदस्य तुकाराम ठिकरे, गणपत कोठारे, छाया शेंडे, मनीषा जवादे, उर्मिला तरारे, संगीता चौधरी यांनी ठरवास मान्यता दिली. गटविकास अधिकारी सुनीता मरसकोले यांनी अंमलबजावणी करून ग्रामपंचायतला रेकॉर्ड परत केले असून ग्रामपंचायत मधून सर्व जन्म मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
प्रतिक्रिया
– जुन्या जन्म -मृत्यूच्या दाखल्यासाठी पायपीट करीत नागरिकांना पंचायत समितीच्या चकरा मारावे लागत होते परंतु या निर्णयामुळे गावातूनच दाखले मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत. या निर्णयासाठी गटविकास अधिकारी मरसकोले यांनी साथ दिली आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन दाखले मिळवावे.
– विजय कोरेवार
सभापती पं स सावली
- काही वर्षांपासून ग्रामपंचायत स्थरावर असलेले सदरचे अधिकार काढून ते पंचायत समिती कडे देण्यात आल्याने गावातील जनतेला याचा खूपच नाहक त्रास ( आर्थिक व मानसिक ) सहन करावा लागत होता . पंचायत समिती च्या कार्यक्षम सभापतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्यामुळे आम्ही गावकरी या निर्णयाचे स्वागत करतो.
अनिल गुरनुले ( व्याहाड बूज. )