सावली शहरात गतिरोधकासाठी पत्रकार सरसावले

241

– नगर प्रशासनाला दिले निवेदन, गतिरोधका विना अपघाताचे वाढले प्रमाण
The गडविश्व
ता. प्र / सावली, २१ ऑक्टोबर : चंद्रपूर – गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग सावली शहरातून जातो. मात्र या मार्गावर गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे सावली शहरात गतिरोधकाची निर्मिती करावी अशी मागणी शहरातील पत्रकार मंडळींनी केली आहे. यासंदर्भात स्थानिक नगर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
विशेष म्हणजे चंद्रपूर-गडचिरोली राज्यमार्ग असताना या मार्गावर काही ठिकाणी गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर सिमेंट काँक्रीटचा नवा रस्ता निर्माण करण्यात आला. सदरच्या मार्गावर मुख्यत्वे शहरातून जाणार्‍या मार्गावर गतिरोधक अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र या महामार्गावर कोणत्याही प्रकारच्या गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली नाही. परिणामी भरधाव वाहनांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे अपघाताला चालना मिळत असून गतिरोधकाविना अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या महामार्गावरून प्रवास करीत असताना भरधाव येणाऱ्या वाहनामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
सावली शहरात मोठी बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिक या शहरात येत असतात. महामार्गालगतच्या शाळा-महाविद्यालये, कार्यालय, दुकाने,खाजगी दवाखाना असल्याने शहरात गर्दीचे प्रमाण दिसते. तर शाळांची सुट्टीच्या वेळेस विद्यार्थ्यांची गर्दी होते. त्यामुळे वाहनांची गती कमी करण्यासाठी महामार्गावर गतिरोधकाच्या मागणीसाठी पत्रकार मंडळींनी पुढाकार घेत मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांना निवेदन दिले. मागणीचा पाठपुरावा करून सावली शहरातील राष्ट्रीय महामार्गावर लवकरच गतिरोधक लावण्यात येतील व कोंडवाडा सुरू करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासित केले. यावेळी उदय गडकरी, सतीश बोम्मावार, लोकमत दुधे, शितल पवार, आशिष दुधे, सुरज बोम्मावार, प्रवीण गेडाम, उमेश वाळके आदी पत्रकार हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here