– ब्रह्मपुरी येथे ६०९ लाभार्थ्यांना घरकुल तर ७१ दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे वाटप
The गडविश्व
ब्रम्हपुरी, ५ ऑगस्ट : जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला यशस्वी जीवनाच्या वाटेवर चालताना समाजाचे अमूल्य योगदान लाभते. तर समाजाच्या योगदानाने जीवनमान उंच शिखरावर नेणाऱ्या प्रत्येक मनुष्याचे समाजाप्रती देणे असते. जनतेने दिलेला आशीर्वादच्या बळावर एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भोई समाजाला ( एन. टी.) विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जिल्ह्यात २४१६ घरकुल व ब्रह्मपुरी तालुक्यातील ७१ दिव्यांग बांधवांना स्वयंचलित तीन चाकी सायकल मिळवून देण्यात मिळालेले यश म्हणजे जनसेवेच्या व्रतातून समाजाचे ऋण फेडण्याची मिळालेली संधी होय असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने सहा. आयुक्त समाज कल्याण विभाग यावलीकर, पं.स. गटविकास अधिकारी संजय पुरी, ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर माजी जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, स्मिता पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, किसान काॅंग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट यांची उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून मानवता धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. समाजातील प्रत्येक घटकाला संविधानिक अधिकारातून न्याय मिळवून देण्यासाठी व उपेक्षित , वंचित , दुर्लक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून चांगले जीवन जगण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने हक्काचे घरकुल मंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्राम खेड्यातील गोरगरीब भोई समाज बांधवांना हक्काचे व स्वप्नातील घर मिळणार असून याचा निश्चितच जीवनमान उंचावण्यासाठी फायदा होईल. तसेच दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलने प्रवासासाठी मार्गही सुकर होणार हे सर्व मिळवून देण्यासाठी मला मिळालेली जनसेवेची संधी हे लाभलेले भाग्यच होय असेही ते यावेळी म्हणाले. क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्या त महाविकास आघाडी सरकार काळात गावागावात विकास निधी देऊन जिल्ह्याच्या विकासात भरही घातल्याची आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.
याप्रसंगी ब्रह्मपुरी तालुक्यातील ६०९ भोई समाज बांधवांना घरकुल मंजुरीची प्रमाणपत्रे तथा ७१ दिव्यांग बांधवांना स्वयंचलित तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्मपुरी काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके यांनी सूत्रसंचालन राहुल मैंद तर आभार माजी प. स. सदस्य थाणेश्वर कायरकर यांनी मानले.
