– ब्रम्हपुरी येथे कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्धघाटन
– लोकांच्या हाताला काम देणे हेच सर्वोच्च प्राधान्य
The गडविश्व
चंद्रपूर : “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उद्धारी” ही म्हण कालबाह्य झाली आहे. आता “जिच्या हाती आर्थिक व्यवहार, ती कुटुंबाचा आधार” ही संकल्पना समाजात रूजविण्यासाठी महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण कटिबद्ध आहो. पुढील एक – दोन वर्षात जवळपास 10 हजार महिलांना प्रशिक्षणातून रोजगार उपलब्ध करून देवून खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली.
सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळ व लोकर संशोधन केंद्र, मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्धघाटन करतांना ते बोलत होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महामंडळाचे विभागीय अधिकारी राजू इंगळे, सीडीसीसी बैंकेचे संचालक संदीप गड्डमवार, सावली पं.स. सभापती विजय कोरेवार, दिनेश चिटकुनवार, तहसीलदार परिक्षित पाटील, नगर पंचायत मुख्याधिकारी मनिषा वाझाड़े, माविमचे जिल्हा समन्वयक उगेमुगे आदी उपस्थित होते.
कार्पेट निर्मितीचा उद्योग महिलांच्या कुटुंबासाठी कायम सावली देणारा ठरावा, असे सांगून पालकमंत्री वड़ेट्टीवार म्हणाले, मुलांच्या भविष्यासाठी आई नेहमी चिंतेत असते, मात्र तिच्याजवळ पैसा नसतो. ही चिंता आता दूर होणार असून सावली तालुक्यातील हा प्रकल्प महिलांसाठी वरदान ठरणार आहे. खनीज प्रतिष्ठान आणि माविमच्या माध्यमातून कार्पेट निर्मितीचा प्रकल्प उभा होत आहे. यामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या होतील. दोन महिन्यात 80 महिलांना प्रशिक्षित करून पुढील वर्षभरात 500 महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महिला या स्वाभिमानाने जगतात. कर्ज़ासाठी आपल्या दारात कोणी आलेले त्यांना आवडत नाही, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, सध्यस्थितीत ब्रम्हपुरी येथे एक हजार महिला काम करीत आहेत. येत्या 3 वर्षात ब्रम्हपुरी क्षेत्रातील जवळपास 10 हजार महिला रोजगार सक्षम होतील. महिलांच्या उत्पादित वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जाईल. या प्रकल्पासाठी 13 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर केले असून लगेच प्रशिक्षण आणि मार्केटिंगचे धेय्य ठेवण्यात आले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे म्हणाल्या, जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सावली येथे कार्पेट निर्मितीचा प्रकल्प उभा राहत आहे. देशात ज्याप्रमाणे कार्पेटकरिता भदोई प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे सावलीसुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्हावे. एखादा उद्योग अमंलात आणतांना त्यासोबत तांत्रिक माहिती असण्यासाठी तज्ञ समिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई येथील लोकर संशोधन संघाच्या मदतीने हा प्रकल्प होत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटाची उत्पादने आता ॲमेझॉनवर सुद्धा झळकत आहे. मात्र, माविमला स्वतःची बाजारपेठ असावी. चंद्रपूर जिल्ह्यात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे माविमच्या माध्यमातून बांबूच्या वस्तू जिल्ह्याबाहेर गेल्या पाहिजे. तसेच माविम प्रांगण किंवा माविम महिला घर जिल्ह्यात उभारण्यासाठी 5 एकरची जागा व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. तसेच माविमच्या प्रगतीचा आलेख सुद्धा त्यांनी विशद केला.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, महिला सक्षमीकरणाची सुरुवात खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू झाली आहे. सुरुवातीला 800 महिलांना रोजगार देण्यात येणार असला तरी, ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली येथील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा महिलांना फायदा होईल तसेच कुटुंबाला आधार मिळेल, असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच कार्पेट युनिटचे उद्घाटन केले.मान्यवरांनी कार्पेट निर्मितीचे प्रात्यक्षिक बघून आनंद व्यक्त केला.
यावेळी संघमित्रा महिला सक्षमीकरण समिती, मातोश्री महिला सक्षमीकरण समिती, प्रज्ञा महिला सक्षमीकरण समिती, एकता महिला सक्षमीकरण समिती, प्रगती महिला सक्षमीकरण समिती आणि सखी महिला सक्षमीकरण समितीला धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण पूरक प्लास्टिक पिशव्या आणि माविमच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अधिकारी नरेश उगेमुगे यांनी तर आभार नरेंद्र वनकर यांनी मानले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.