The गडविश्व
गडचिरोली : चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात २८ जुलै रोजी ‘ओसीडी आणि चिंता विकार विशेष ओपीडी’चे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ओसीडी आणि चिंता विकार विशेषज्ञ डॉ. सागर चिद्दरवार हे मानसिक आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करणार आहेत.
चिंता विकार असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकच कृती वारंवार करणे, पुन्हा पुन्हा साफ सफाई करणे, सतत विचार करत राहणे, कामात लक्ष न लागणे, सारखे निराश वाटणे, मन अस्वस्थ वाटणे, चीड चीड होणे, जेवण आणि झोप कमी होणे, विचारात गुंग राहणे, खूप एकटे वाटणे, आत्महत्येचे विचार येणे, सतत भीती वाटणे, छातीत धड धड होणे, थरकाप सुटणे, स्वास अडकल्यासारखे वाटणे, विनाकारण हसणे, स्वतःशी बोलत राहणे, असे काही या आजाराची लक्षणे आहेत. चतगाव येथे सर्च रुग्णालयात नियमित मानसोपचार ओपीडी सुरूच असते. येथील रुग्णांचा वाढता प्रतिसाद बघता सर्च हॉस्पिटलने या विषयातील विशेषज्ञांकडून सेवा पुरवण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी विशेष मानसिक ओपीडी घेण्याचे ठरवले आहे.
नागपूर येथील ओसीडी आणि चिंता विकारतज्ञ डॉ. सागर चिद्दरवार यांच्या सहकार्याने ही ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी वेगवेगळ्या मानसिक आजारांसाठी ही ओपीडी असेल . ओपीडीची वेळ सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत राहणार असून ओसीडी आणि चिंता विकाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा तसेच गैरसोय होऊ नये म्हणून हॉस्पिटलमध्ये पूर्व नोंदणी करावी, असे आवाहन मानसोपचार तज्ञ डॉ. आरती बंग यांनी केले आहे.