The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येशील ‘सर्च ‘रुग्णालयात २ मे रोजी श्वसनविकार आणि बालरोगविकारावर पहिली ओपिडी सुरु होत आहे. यासाठी डॉ. वेदपाठक हे वरिष्ठ आणि अनुभवी श्वसन विकारतज्ञ उपलब्ध राहतील.
जागतिक अंदाजानुसार कर्करोग आणि हृदयविकारांनंतर श्वसन विकार हे मृत्यूचे तिसरे सर्वात महत्त्वाचे कारण ठरत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे या विकाराचे प्रमाणही निर्विवादपणे वाढतच आहे. गडचिरोली सारख्या भागातही वाढत्या शहरीकरणामुळे श्वसनविकारांचे रुग्ण वाढत आहेत. समाजाची ही गरज लक्षात घेता सर्च हॉस्पिटल लवकरच श्वसनविकार ओपीडी सुरू करत आहे. या ओपीडीसाठी दरमहिन्याच्या पहिल्या सोमवार पासून ते पहिल्या शनिवारपर्यंत (दर महिन्याचा पहिला आठवडा) डॉ. वेदपाठक हे उपस्थित राहतील. याची सुरुवात मे महिन्याच्या २ तारखेपासून होत आहे आणि ही ओपीडी ७ मे पर्यंत सुरू राहील. दमा, सिगारेटमुळे झालेले श्वसनविकार, क्षयरोग व क्षयरोगानंतर होणारे फुफ्फुसविकार, कोरोनामुळे उद्भवलेले फुफ्फुसविकार, लहान मुलांचा दमा, ॲलर्जीमुळे होणारे श्वसन विकार अशा असंख्य श्वसनविकारांवर उपचार दिले जातील.
बालरोग ओपीडी
सर्चच्या ‘घर आधारित माता व शिशु‘( HBNC) कार्यक्रमाच्या सर्वश्रृत यशानंतर बदलत्या काळाच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेता सर्च हॉस्पिटलच्या माध्यमातून आता हॉस्पिटलमध्येच तज्ञ डॉक्टरांकडून बालरोगांची तपासणी व उपचार दिले जाणार आहेत. या उपक्रमासाठी डॉ. वेदपाठक हे वरिष्ठ आणि अनुभवी डॉक्टर दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्च हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहतील. या सुविधेची सुरुवात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून (२ मे ते ७ मे) होत आहे. सर्च हॉस्पिटल कडून पुरवल्या जाणाऱ्या अनेक सुविधांप्रमाणेच या सुविधा सुद्धा सवलतीच्या दरात किंवा मोफत पुरवल्या जातील. वयोगट ० ते १८ पर्यंतच्या रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येईल.