“ खर्र्याला नाही म्हणा ” – मुक्तिपथ व एनटीसीपी द्वारा आवाहन
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिवसाच्या निमित्ताने खर्राला नाही म्हणा, खर्रामुक्तीची शपथ घ्या असे आवाहन मुक्तिपथ व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली जिल्हा सेल द्वारा करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी, शासकीय व खाजगी कार्यालयांच्या व सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी खर्रा न खाण्याचा संकल्प घेऊन तंबाखूला नकार द्यावा, असे आवाहनात म्हंटले आहे. ३१ मे या दिवसी तसेच यापुढे नियमितपणे जिल्हा स्तरीय तंबाखू नियंत्रण पथक सक्रीय राहील, कायद्याचे उल्लंघन करत तंबाखू पदार्थ विक्री करतांना आढळल्यास सदर व्यक्तीवर, किराणा दुकान, पानठेला, होलसेल किंवा किरकोळ विक्रेता असल्यास कायदेशीर तपासणी प्रक्रिया पथका द्वारा करून कारवाई केली जाईल.
विदर्भातील गावा-गावात वाढत असलेला तोंडाचा कॅन्सर हा मोठा चिंतेचा विषय बनत आहे. खर्रा खाण्याने गडचिरोली जिल्ह्यातील अनेकांना कॅन्सर झाल्याची उदाहरणे आहेत. शिकलेली, नोकरी करणारी, पांढरपेशी वर्गातील व्यक्ती असो कि, शेतात दिवसभर कामे करताना, इतर सामान उचलणे किंवा तशी अंग मेहनतीची कामे करणारे मजूर, एक दोन अपवाद सोडले तर हमखास सर्वांच्या तोंडात खर्रा असलेला बघायला मिळते, हे थांबणे गरजेचे आहे. गडचिरोलीतील पुरुषांसोबतच महिला आणि मुलांमध्येही खर्रा खाण्याचे प्रमाण जास्त आहे. अगदी कमी वयापासूनच आपल्या जिल्ह्यातील मुलांना खर्र्याची ‘तोंड’ओळख झालेली असते. सर्वांनीच खर्र्यापासून दूर राहावे, व स्वत:चे व कुटुंबाचे भविष्य आणखी उज्ज्वल करावे यासाठी हा संकल्प घ्यावा.
३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो. तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे मृत्यू ही जागतिक समस्या आहे. त्याचा सर्व स्तरातून विरोध व्हावा, तंबाखू सेवनाला लोकांनी नकार द्यावा, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) हा दिवस जगभरात साजरा केला जातो. खर्राही तंबाखूजन्य पदार्थ आहे, त्यामुळे तंबाखूविरोधी दिवसाच्या निमित्ताने गडचिरोलीतील लोकांनी खर्रा न खाण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन केले आहे.
मुक्तिपथ,
जिल्हा गडचिरोली