-बैठकीतून दारूमुक्त गाव निर्माण करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १ नोव्हेंबर : अवैध दारू व तंबाकू विरोधात कृती करण्यासाठी कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे गडचिरोली तालुक्यातील ४० गावातील गाव संघटनेच्या सदस्यांना ‘कायदा पुस्तिका’ भेट देण्यात आली. सोबतच बैठकीच्या माध्यमातून कायद्याचा आधार घेऊन दारू व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
अवैध दारू व तंबाखू विरोधात लढा देण्यासाठी सुरु असलेल्या मुक्तीपथ अभियानात प्रमुख सहभाग हा जनतेचा आहे. त्यामुळे गाव संघटनेच्या सदस्यांना दारू व तंबाखूवर रोख लावण्यासाठी कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी गडचिरोली तालुक्यातील गडचिरोली तालुक्यातील नगरी, वसा, चुरचुरा माल, कुऱ्हाडी, मुरमाडी, कनेरी, पुलखल, इंदाळा, कुरखेडा, आंबेटोला, गिलगाव, बेलगाव, कळमटोला, दिभना, खरपुंडी, बोदली, मारदा, रानमुल, गोगाव, नवरगाव, पोर्ला, काटली, महादवाडी, भिकारमौशी, वाकडी, मूडझा, मारोडा, जमगाव, गोविंदपूर, अमीर्झा, पोर्ला, मेंढा यासह ४० गावांमध्ये बैठकीचे आयोजन करून गावातून दारू व तंबाखू हद्दपार करण्यासाठी कोणत्या कायद्याचा कसा वापर करायचा याबद्दलची माहिती देण्यात आली.
गाव संघटनेच्या सदस्यांना दारूबंदीच्या प्रमुख कलम व कायदे, पेसा कायदा १९९६, ग्रामपंचायत अधिनियम नुसार गावात दारूविक्रीबंदी अधिनियम, सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा बंदी कायदा- २०१२, अल्पवयीन मुलांसाठी संरक्षण कायदा – २०१५, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ कोटपा (COTPA), महाराष्ट्र राज्य अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ कलम ६ नुसार, साथरोग प्रतिबंध कायदा आदी कायद्यांची विस्तृत अशी माहिती असलेली माहिती पुस्तिका भेट देण्यात आली. सदर कायद्याची माहिती मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी बैठकीत समजून सांगितली. यावेळी स्पार्क अभ्यासक्रम कार्यकर्ते उपस्थित होते.