– लालडोंगरी मोहल्ला संघटना व मुक्तिपथची कृती
The गडविश्व
गडचिरोली, १० नोव्हेंबर : चामोर्शी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या लालडोंगरी वॉर्डात मोहल्ला संघटना व मुक्तीपथने संयुक्तरित्या कृती करीत ५२ हजारांच्या दारुसह विक्रेत्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रणय चौधरी असे आरोपीचे नाव आहे.
लालडोंगरी वॉर्डात एकूण सहा दारूविक्रेते सक्रिय आहेत. काही विक्रेत्यांच्या माध्यमातून शहरातील विविध वार्डातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. या अगोदरही काही विक्रेत्यावर पोलिसांद्वारे कार्यवाही झाली आहे, मात्र विक्री बंद होत नव्हती. दरम्यान, मोहल्ला संघटनेचे पदाधिकारी व मुक्तीपथ तालुका चमू यांना प्रणय चौधरी या दारूविक्रेत्याच्या घरी दारूसाठा आहे अशी निश्चित माहिती मिळाली असता, चौकशी मध्ये ९ पेट्या देशी दारू, २ पेट्या विदेशी दारू व १० लिटर मोहफुलाची दारू असा एकूण ५२ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. यासंदर्भात माहिती देताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून, तपासणी व पंचनामा केला व मुद्देमालासह विक्रेत्यास अटक केली. सदर कारवाई पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली. यावेळी मुक्तिपथ मोहल्ला संघटनेचे निर्मला वनकर, पूजा उंदिरवाडे, प्रेमल उंदिरवाडे, प्रियंका राऊत, राजू उंदिरवाडे व मुक्तीपथ तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम उपस्थित होते.