The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील चांदाळा शेतशिवारात विविध ठिकाणी मिळून आलेला ९० हजार रुपये किंमतीचा १७ ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शुक्रवारी केली.
चांदाळा या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जाते. या गावाच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरासह इतर गावात सुद्धा दारू पुरविल्या जाते. सोबतच गावात मद्यपींची लाईन लागलेली असते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या चांदाळा शेतशिवारात शोधमोहीम राबवत दारूअड्डे उध्वस्त केले. तसेच पाच ते सहा ठिकाणी टाकलेला जवळपास ९० हजार रुपये किंमतीचा १७ ड्रम मोहसडवा व साहित्य नष्ट केला आहे. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवदास दुर्गे, पोशि प्रीतम बारसागडे, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.