– बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १५ : तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे उघडकीस आले असून, आरोग्य विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. विशेष समितीच्या तपासणीत ३१ बोगस डॉक्टर आढळले असून, त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे यांनी दिली.
तालुक्यात बिना वैद्यकीय डिप्लोमा व प्रमाणपत्र रुग्णांवर उपचार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या निष्काळजी उपचारांमुळे अनेक निरपराध रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळेच तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील विशेष समिती गठीत करण्यात आली. या तपासणीत धानोरा, चातगाव, गोडलवाही, पयडी, पेंढरी, ढोरगट्टा, कारवाफा, खुटगाव, सुरसुंडी, मुरुम, खांबाळा, सावरगाव, येरकड, निमगाव, रांगी, मोहली, गुजनवाडी, जपतलाई या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचे आढळले.
समितीने बोगस डॉक्टरांना नोटीस बजावली असून, अनेकांनी आपली वैद्यकीय पात्रता नाकारली. काही जणांकडून जबाबही लिहून घेतला गेला. त्यामुळे आता या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाच्या धडक कारवाईने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #dhanora #breaking