– रोजगार मेळावा तरुणाईच्या कौशल्याला संधी देणारे माध्यम ठरणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या टोकावर असला तरी आता येथे मोठमोठे उद्योग येत आहेत. या उद्योगांना लागणाऱ्या कौशल्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यारे अभ्यासक्रम आता पुढल्या काळात गोंडवाना विद्यापीठात आम्ही सुरू करीत आहोत. येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला संधी देण्याचे कार्य अशा पदवीधर मेळाव्यातून उत्तमरीत्या होते. त्यामुळे सातत्याने असे मेळावे आयोजित करुन तरुणाईला करियरच्या संधी यापुढेही उपलब्ध करुन देण्यात येतील. फक्त गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाईने दारी चालून आलेल्या अशा संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अनिल हिरेखन यांनी केले.
आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून गोविंदराव फाऊंडेशनच्या वतीने येथील महाराजा सेलिब्रेशन सभागृह येथे आयोजित पदवीधर रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी होते. मंचावर काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, समशेर खाँन पठाण, गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे, रघुराम गायकवाड उपस्थित होते. या रोजगार मेळावामध्ये 517 पदवीधरांना ‘ऑफर लेटर’ मिळाले.
दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पदवीधर रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. ॲड. अभिजित वंजारी म्हणाले, कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची अनेक क्षेत्रात आवश्यकता आहे. मात्र, कंपन्या योग्य व्यक्तीपर्यंत अथवा संबंधित व्यक्ती कंपन्यांपर्यंत पोहचू शकत नाही. या दोहोंमधला दुआ बनण्याचे कार्य पदवीधर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गोविंदराव वंजारी फाऊंडेशन करत आहे. राज्यभरातील विविध नामांकित कंपन्या एकाच ठिकाणी आणून रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ कसा घ्यायचा, निवड झाल्यानंतर, ऑफर लेटर मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने कसे करायचे, हे उमेदवारांनी ठरवायचे आहे. आयुष्यात संधी वेळोवेळी मिळत नाही. मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले. येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा कायम आता आमच्यासोबत जुळलेला असेल. ज्यांना नोकरी अथवा संधी या मेळाव्यात मिळाली नाही, त्यांच्यासाठी यापुढेही गोविंदराव फाऊंडेशन प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जिल्ह्यातील बेरोजगारीकडे लक्ष वेधले. गडचिरोली जिल्हा आजही दुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील तरुणाईला शिक्षणानंतर नोकरीच्या वाटा शोधताना आजही अडचण जाते. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी ही निकड ओळखून गडचिरोली जिल्ह्यात पदवीधर रोजगार मेळाव्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. अशा प्रकारची संधी गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाईला पहिल्यांदाच मिळाली. आम्ही संधीच्या शोधात आहोत, हे मेळाव्यात जमलेल्या गर्दीने दाखवून दिले, असेही ते म्हणाले.
गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे यांनी प्रास्ताविकातून पदवीधरांसाठी रोजगार मेळावा आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गोपाल चव्हाण यांनी केले. आभार डॉ. संतोष चकोले यांनी मानले. मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील हजारो पदवीधर युवक-युवती सहभागी झाले होते.

517 जणांना मिळाले ‘ऑफर लेटर’
पदवीधर रोजगार मेळाव्यात निर्मिती,ऑटोमोटिव्ह, आय.टी., बँकिंग, सर्व्हिस, फार्मा, कृषी क्षेत्रातील सुमारे 36 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कंपनीच्या प्रतिनिधींनी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेत योग्य उमेदवारांची निवड केली. सुमारे 517 युवक युवतींना आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आले.