– सत्ताधाऱ्यांनी डोळे उघडावेत अशी जनतेची अपेक्षा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही देशातील अनेक दुर्गम गावांना मूलभूत सुविधा मिळाल्या नव्हत्या. अशाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कटेझरी गावात, तब्बल ७८ वर्षांनी प्रथमच एस.टी. बस धावली आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.
गडचिरोली पोलीस दलाच्या अथक प्रयत्नांनी व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने, २६ एप्रिल रोजी कटेझरी ते गडचिरोली या मार्गावर बससेवेचा शुभारंभ झाला. गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात बसचं स्वागत करत या ऐतिहासिक घटनेला साजरं केलं.
उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या हस्ते बससेवेचे उद्घाटन करण्यात आले, तर पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ झाली. हा क्षण फक्त बस सुरू होण्याचा नव्हता, तर दशकानुदशकांची उपेक्षा संपल्याचा विजय होता.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये अजूनही अनेक गावांना रस्ता, वीज, पाणी, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. विकासाच्या गप्पा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या गावांच्या स्थितीकडे गांभीर्याने पाहिले असते तर ही बस ७८ वर्षांनी नव्हे, तर ७८ महिन्यांतच पोहोचली असती, अशी नाराजी अनेकांनी व्यक्त केली.
मागील पाच वर्षांत पोलिस संरक्षणाखाली ४३४.५३ किमी लांबीचे १८ रस्ते आणि ५९ पूल पूर्णत्वास नेण्यात आले. आज कटेझरी बससेवेच्या माध्यमातून पोलिसांनी पुन्हा एकदा विकासाचा खरा अर्थ समजावून दिला आहे.
या बससेवेने केवळ कटेझरीच नव्हे तर आजूबाजूच्या १०-१२ गावांनाही शिक्षण, आरोग्य आणि रोजंदारीच्या दृष्टीने नवे जीवन दिले आहे. आता पोलीस व जनतेतले नाते अधिक दृढ होईल आणि आदिवासी भागातही विकासाचा प्रकाश पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आज कटेझरीतील मातीत नव्या आशेचा अंकुर फुटला आहे… प्रश्न फक्त एवढाच आहे की, सत्तेच्या उच्चपदांवर बसलेल्यांना ही उमलती आशा दिसतेय का?
