– काँग्रेसच्या विचारसरणीवर नाराज होत पक्षाला ठोकला रामराम
The गडविश्व
गडचिरोली : येथील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेले रोजगार सेल शहराध्यक्ष बाशिद शेख यांनी काँग्रेसच्या २० पेक्षा अधिक कार्यकर्त्यासह पक्षाला रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या ध्येय धोरणांवर व ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतिने गडचिरोली शहर विकासाचा पंचनामा या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी ढोल ताशाच्या गजरात पक्ष प्रवेश करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांचा एकाचवेळी पक्षाला रामराम करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने गडचिरोलीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
पक्ष प्रवेश करताना बाशिद शेख यांच्यासह आशिष केळझरकर, सलिमभाई मंसुरी, कार्तिक कांबळे, रुपांतर लाडे, किशोर राऊत, राहूल मेश्राम, जगदिश टेंभुर्णे, सुरेश नंदेश्वर, गणपत लाडे, अजय उंदिरवाडे, जावेद शेख, ओमप्रकाश लाडे, शाहरूख शेख, भिमराव उंदिरवाडे , राजू लाडे, रविराज लाडे, योगेश दुर्गे, अजरूद्दीन शेख, जिशान शेख, बाळू मशाखेत्री, स्वराज मशाखेत्री, स्वराज लाडे आदि कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्ष प्रवेश केला. यावेळी वंचीत बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाचा दुपट्टा व टोपी घालून सर्वांचे स्वागत केले.
बाशिद शेख म्हणाले की, आजपर्यंत मुस्लिम समाज कॉंग्रेसवर विश्वास ठेऊन तनमन धनाने काँग्रेसचे काम करीत होता परंतु काँग्रेस मुस्लिम समाजाचा उपयोग फक्त व्होट बॅंक म्हणून करते, परंतु जेव्हा मुस्लिम समाजांवर हल्ले होतात किंवा त्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढण्याची वेळ येते तेव्हा काँग्रेस मुस्लिम समाजाच्या बरोबरीने ऊभी राहत नाही त्यामूळे काँग्रेसचे जे धोरण आहे वापरा आणि फेकून द्या ते मुस्लिम समाजाच्या लक्षात आल्याने अनेक नेते व कार्यकर्ते काँग्रेस पासून दूर जात आहेत. येणाऱ्या काळात काँग्रेसकडे औषधालाही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते राहणार नाहीत तसेच जिल्हा स्तरापासून ते केंद्रापर्यंत काँग्रेस नेतृत्वहिन झाला असल्याने अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडी मध्ये येण्याच्या तयारीत आहेत असेही बाशिद शेख यावेळी म्हणाले. बाशिद शेख यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाला सुरुंग लागणार काय याकडे लक्ष लागले आहे.
पक्ष प्रवेशावेळी प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बंसोडे, प्रदेश सदस्य कुशल मेश्राम, पूर्व विदर्भ समन्वयक डॉ. रमेशकुमार गजबे, संयोजक राजू लोखंडे, मुरलिछधर मेश्राम, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महासचिव मंगलदास चापले, संघटक धर्मेंद्र गोवर्धन , भिमराव शेंडे, मंजुषा थेरकर , प्रज्ञा निमगडे, भोजराज रामटेके , मनिषा वानखेडे , तुळशिराम हजारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.