हेतू अस्पृश्योद्धार व शिक्षण संस्कार!

285

श्रीपाद महादेव माटे जयंती

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रा.श्री.म.माटे हे शिकवत असतानाच गोपाळ गणेश आगरकर यांचे अनुयायी सीतारामपंत गणेश देवधर आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. त्यातूनच त्यांना निरपेक्ष बुद्धीने सार्वजनिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. दारिद्य्राचा अनुभव त्यांनी बालपणी घेतलेला होता; त्यामुळे अस्पृश्य समाजाची उच्चवर्णीयांकडून होणारी अक्षम्य उपेक्षा, शिक्षणाचा अभाव, त्यांची सामाजिक व आर्थिक मुस्कटदाबी, गुणांना वाव न मिळाल्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेले दारिद्य्र, त्यांचा इतरांकडून होणारा अपमान, हीन लेखल्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेली तुच्छता या सार्‍यांची जाणीव माटे साहेबांना तीव्रतेने झाली. उच्चवर्णीयांची या उपेक्षित व वंचित वर्गाकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित दृष्टी बदलणे त्यांना अत्यावश्यक वाटले. समाजाची खरी प्रगती व्हायची असेल, तर संपूर्ण समाजाचे परिवर्तन होणे गरजेचे आहे. उपेक्षित समाजाला विकासाची संधी मिळालीच पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. पुण्यातील मातंग वस्तीत रात्रीच्या शाळा स्वखर्चाने चालविण्याचे अत्यंत मोलाचे, समाजसुधारणेचे कार्य त्यांनी आपल्या आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात अविरतपणे, निष्कामबुद्धीने आणि जिद्दीने चालविले. मांगवाड्यात पहिली शाळा, मंगळवार पेठेतील महार वस्तीत दुसरी शाळा, नारायणपेठेत नदीकाठी तिसरी शाळा अशा एकूण बावीस शाळा त्यांनी सुरू केल्या. या कार्यामागील हेतू अस्पृश्योद्धार करणे व शिक्षण संस्कार करणे हा होता.
प्रा.श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म दि.२ सप्टेंबर १८८६ रोजी वर्‍हाडातील शिरपूर या गावी झाला. त्यांचे वडील महादेव माटे हे संस्कृतविद्या पंडित म्हणून महादेवशास्त्री या नावाने परिचित होते. त्यांच्या मातोश्री उमाबाई होत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्या दांपत्याला पाच मुले होती व श्रीपाद हे त्यांचे शेवटचे अपत्य होते. ते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या पित्याचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांच्या आईने माहेरचा आश्रय घेतला खरा; पण दारिद्य्राशी झगडण्यात व हालअपेष्टा सोसण्यात माटे व त्यांच्या भावांचे बालपण गेले. विटे येथील प्राथमिक शाळेत माटे यांनी दुसरीत प्रवेश घेतला, तेव्हा त्यांचे मूळनाव श्रीपती, हे बदलून श्रीपाद झाले. सन १९०५ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र घरच्या गरिबीमुळे त्यांना तो विचार सोडावा लागला. नंतर सातार्‍यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. सन १९११ साली ते लक्ष्मीबाईंशी विवाहबद्ध झाले. त्याच सुमारास त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ते शिक्षणाच्या हव्यासापोटी ते बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुन्हा त्याच शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागले. सन १९१५ साली ते इंग्लिश व मराठी विषय घेऊन एमएची परीक्षा उत्तीर्ण झाले. सरकारी नोकरी करणार नाही, असा त्यांचा निर्धार होता. त्यामुळे विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते इंग्रजी विषयाचे अध्यापक झाले.
त्यांच्या साहित्यनिर्मितीतील परिश्रमपूर्वक सिद्ध केलेला अत्यंत महत्त्वाचा, पण उपेक्षित राहिलेला ग्रंथ म्हणजे अस्पृष्टांचा प्रश्न या पुस्तकातील पहिल्या साडेचारशे पृष्ठांत अस्पृश्यतेच्या समस्येची सांगोपांग तात्त्विक चर्चा त्यांनी केलेली आहे. उरलेल्या पृष्ठांत अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातील त्यांना आलेल्या अनुभवांचे वास्तव कथन आहे. भटक्या जमातींच्या समस्यांचा ऊहापोहही या ग्रंथात केलेला आहे. सर्वेक्षण, आकडेवारी, विविध प्रश्नावली व त्यांच्या उत्तरांतून मिळालेली महत्त्वाची माहिती आणि या सर्वांच्या आधारे त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धान्त असे या ग्रंथांचे स्वरूप आहे. या ग्रंथामागील त्यांची भूमिका प्रचारकाची नसून समाज शास्त्रज्ञाची आहे. हा ग्रंथ म्हणजे अस्पृश्यतेच्या प्रश्नांचा ज्ञानकोश आणि समाजशास्त्रीय अभ्यासकांसाठी अमोल खजिना आहे, असे प्रा.स.गं.मालशे यांनी समर्पक शब्दांत प्रस्तुत ग्रंथाचे मूल्यमापन केलेले आहे. मात्र या ग्रंथात त्यांनी वंशशुद्धीचे जे समर्थन केलेले आहे, ते कालबाह्य वाटल्यामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना सनातनी सुधारक म्हटले आहे. या ग्रंथातून माट्यांच्या पांडित्य, तर्कनिष्ठा, चिंतनशीलता आणि सहृदयता यांचे दर्शन घडते, हे निःसंशय! परशुराम चरित्रात हिंदू समाजरचनेतील तत्त्वांची सूक्ष्म दृष्टीने केलेली चिकित्सा असून, हिंदू समाजाच्या जडणघडणीचा वेध पंचमानव हिंदू समाज म्हणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विज्ञानबोध या ग्रंथाला लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना ही त्यांच्या विज्ञाननिष्ठेची द्योतक आहे. विज्ञाननिष्ठेची जोपासना झाल्याशिवाय सांस्कृतिक जीवन खर्‍या अर्थाने समृद्ध होणार नाही, असे आग्रहाचे प्रतिपादन प्रस्तुत प्रस्तावनेत आहे. गीता तत्त्वविमर्श या ग्रंथातील लेखातून लोकमान्य टिळकांच्या काही विधानांशी, निष्कर्षांशी असलेला त्यांचा मतभेद, गीतेत त्यांना जाणवलेली अतार्किकता त्यांनी निर्भीडपणे व्यक्त केली आहे.
शैलीकार माटे हे भूषणही त्यांना कथा लेखनानंतर मिळाले. लेखकाची उत्कट संवेदनशीलता, सामाजिक अन्यायाबद्दल कणव आणि तो दूर व्हावा, यासाठी त्यांची धडपड, उपेक्षित वर्गाच्या भाषेचे वेगळेपण आत्मसात करण्याची वृत्ती, सहज स्वाभाविकपणे साकारणारे जिवंत अनुभव आणि प्रतिभेचा दिव्य स्पर्श ही त्यांच्या कथेची सामर्थ्ये आहेत. त्यांच्या कथा म्हणजे जीवनावरील भाष्याचे उत्कृष्ट नमुनेच होत. अनामिका, माणुसकीचा गहिवर, भावनांचे पाझर आदी संग्रहांतील कथाही उत्कट अनुभव व लेखकाची प्रामाणिक तळमळ यांमुळे अत्यंत प्रत्ययकारी झालेल्या आहेत. प्राचीन मराठी वाङ्मयाचा विशेषतः संतसाहित्याचा चिकित्सक अभ्यास, हे त्यांचे अत्यंत आवडते क्षेत्र होते. रामदासांचे प्रपंचविज्ञान व संत, पंत आणि तंत या त्यांच्या पुस्तकांत संतसाहित्याचे परिशीलन ते सामाजिक दृष्टिकोनातून करतात. तुकाराम, चोखोबा इत्यादी संतांच्या वाट्याला विषमतेमुळे आलेला छळ त्यांना व्यथित करतो. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास हे त्यांचे विशेष आवडते संत होते. सर्वच संतांबद्दल त्यांना वाटणारी आत्मीयता व्यक्त करताना त्यांची रसिकता, सश्रद्धता आणि हळुवारपणा यांचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे त्यांची तर्कनिष्ठता आणि सामाजिक आशय शोधण्याची वृत्तीही जाणवते. श्री.म.माटे यांनी आपल्या आयुष्यातील पंचेचाळीस वर्षांचा प्रदीर्घ काळ साहित्याची निर्मिती करण्यात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या कार्यात व्यतीत केला. त्यांची वाङ्मयनिर्मिती ही त्यांच्या सामाजिक कार्याचेच एक अविभाज्य अंग आहे; त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान व त्यांनी लिहिलेले ललित वा ललितेतर वाङ्मय यांत एक अतूट अनुबंध आहे. मानवी जीवन सुंदर, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनविण्याच्या ध्यासातून त्यांचे साहित्य सिद्ध झाले आहे. ललित वाङ्मयाने मतप्रचार आणि मतपरिवर्तन होत नाही, असे म्हणणार्‍यांचा दावा चुकीचा आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. जे जे समाजहिताचे वाटते, ते ते लिहून प्रकट करायला आपण बांधील आहोत, या भूमिकेतूनच त्यांनी वाङ्मयनिर्मिती केली. आचार्य अत्रे यांनी माटे यांना खरे जीवनवादी लेखक म्हटले आहे, ते सर्वार्थाने योग्य आहे. सारांश, महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे व प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे. त्यांनी दि.२५ डिसेंबर १९५७ रोजी या जगाचा निरोप घेतला.

!! The गडविश्व न्युज परिवारातर्फे जयंती निमित्त त्यांना व त्यांच्या लोकोपयोगी कर्तृत्वाला विनम्र अभिवादन !!

अलककार- निकोडे कृष्णकुमार गोविंदा.
पोटेगावरोड, गडचिरोली.
भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here