– कारच्या सीट आणि डिक्कीत विशिष्ट बॉक्स करून करत होते तस्करी
The गडविश्व
वर्धा : कारच्या सीट आणि डिक्कीत विशिष्ट बॉक्स करून त्यात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून तस्करी करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत तब्बल २६ लाखांचा २६५ किलो गांजासह चारचाकी वाहन व इतर असा एकूण कूण ३० लाख ५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कय्युम शहा शहन शहा (३४) रा. रहेमतनगर, बोरगाव (मं.) जि. अकोला व शरद बाळू गावंडे (३२) रा. जुनी वस्ती, पठाणपुरा चौक, मुर्तीजापूर, जि. अकोला यांना ताब्यात घेतले आहे.
अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत कारच्या सीट आणि डिक्कीत विशिष्ट बॉक्स करून त्यात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून तस्करी करीत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणात गांजाची अकोल्याच्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी नागपूर-अमरावती महामार्गावरील कारंजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरगाव (ढो.) शिवारात नाकेबंदी करून काही वाहनांची तपासणी केली. यावेळी एमएच ३१ सीआर ८५२७ च्या वाहनाची झडती घेतली असता कारच्या सीट आणि डिक्कीत तयार करण्यात आलेल्या वेगळ्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याचे दिसून आले. त्यात तब्बल २६५ किलो ३२५ ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन चारचाकी वाहनासह ३० लाख ५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस उपनिरीक्षक गिरडकर, पोलीस अंमलदार प्रमोद जांभूळकर, संतोष दरगुडे, हमीद शेख, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, अवी बन्सोड, संजय बोगा, दिनेश बोथकर, अनुप कावळे, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर, नितीन मेश्राम, मनीष कांबळे, गणेश खेवले यांनी केली.