– मुलचेरातील तीन शाळांमध्ये उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली (गडचिरोली ) : व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. अनेक तरुण-तरुणी व शाळकरी मुलेही व्यसनाचे विळख्यात सापडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जागृत करणे आवश्यक असून मुक्तिपथ अभियानाने तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये मुलचेरा तालुक्यातील विविध 3 शाळांमधील 272 विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 82, मुलचेरा वॉर्ड नं.9 मधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 102, श्रीरामपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 88 या तीन शाळांमधील एकूण 272 विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे धडे गिरविले. उपक्रमात तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील 8 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जे विद्यार्थी तंबाखू, खर्रा खात नाही त्यांनी पुढे खाऊ नये. वर्गातील किंवा गावातील सहकारी मित्र खात आहे, त्यांना खाण्यापासून वाचवावे, वडील-आई खर्रा खात असल्यास त्यांना खाऊ नका, अशी विनंती करावी. दुकानात खर्रा किंवा तंबाखू पदार्थ आण्यास जाऊ नये. कुणी आग्रह केल्यास नाही म्हणावे. विद्यार्थ्यांनी गावाचे व शाळेचे व्यसनमुक्तीचे सैनिक बनावे व भविष्यात व्यसनाच्या मार्गाला लागू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गीत, तार टपाल टेलिफोन ,डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून तालुका संघटक रूपेश अंबादे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. व्यसनाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘आमची शाळा तंबाखूमुक्त करु’ असा संकल्प घेतला.