The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), १५ सप्टेंबर : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लेनगुडा गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पावीमुरांडा येथील महिलांनी आक्रमक पावित्रा हाती घेतला आहे. गाव संघटनेच्या महिलांनी लेनगुडा गावातील दहा विक्रेत्यांच्या घर परिसरात अहिंसक कृती करीत ६० हजार रुपये किमतीची दारू, मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केला आहे.
लेनगुडा या गावातील काही लोक अवैधदारू विक्रीचा व्यवसाय करतात, यामुळे शेजारच्या दारूविक्री बंद असलेल्या पाच ते सहा गावातील शौकीन मद्यपी या गावाकडे धाव घेतात. यामुळे दारूविक्रीमुक्त असलेल्या गावातील महिलांना सुद्धा याचा त्रास होतो. त्यामुळे लेनगुडा गावातील अवैध दारूविक्री विरोधात लढा उभारण्यासाठी पावी मुरांडा येथील महिलांनी बैठकीचे आयोजन करून अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्याअनुषंगाने गाव संघटनेच्या महिलांनी लेनगुडा गाव गाठत जवळपास दहा दारूविक्रेत्यांच्या घर परिसरात तपासणी केली असता. यावेळी मिळून आलेला मोहफुलाची दारू, मोह सडवा व साहित्य असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. सोबतच यापुढे दारूविक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचेही ठणकावून सांगण्यात आले. यावेळी गाव संघटनेच्या महिलांसह मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम उपस्थित होते.