आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार : ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

341

The गडविश्व
मुंबई : एकीकडे मुंबईसह राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु असताना अनेक ठिकाणच्या दुकानावरील पाट्या मात्र मराठीत नसायच्या. राज्यातील सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी व्हायची नाही, तसेच दुकानदार यातून अनेक पळवाटा शोधायचे. आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असायचे. मराठीत मात्र लहान अक्षरात नावे असायची. आजच्या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठे ठेवावे लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017’ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here