धक्कादायक : ‘येथील’ रुग्णालयाच्या आवारात आढळले गर्भपात केलेल्या अर्भकांचे अवशेष

315

– गोबर गॅसच्या टाकीत सापडले अर्भकांच्या हाडांचे अवशेष

The गडविश्व
वर्धा : जिल्ह्यातील आर्वीमध्ये असलेल्या कदम रुग्णालयावर एका 13 वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कदम रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. आधीच गर्भपात प्रकरणात हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि एक परिचारिका संगीता काळे यांना अटक झाली आहे. मात्र पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. सध्या पोलीसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना पाचारण करून सापडलेले अवशेष त्यांच्या ताब्यात दिले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी मधील कदम हॉस्पिटलमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कदम हॉस्पिटलच्या परिसरात इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीमधून गर्भपात करण्यात आलेल्या अर्भकांच्या अकरा कवट्या आणि पंचावन्न हाड मिळाली आहेत. पोलिसांनी एका 13 वर्षीय गर्भवती मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी आधीच कदम हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि एक परिचारिका संगीता काळे यांना अटक केली होती. डॉ. रेखा कदम यांच्यावर आरोप होता की, त्यांनी सहा जानेवारी रोजी एका 13 वर्षीय बालिकेचा पाच महिन्याचा गर्भ गर्भपात केला होता.
गोपनीय सूत्रांकडून हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी १० जानेवारीला डॉ. रेखा कदम यांना अटक केली. त्यानंतर कदम हॉस्पिटलमधील परिचारिका संगीता काळे यांनाही अटक करण्यात आली. दोघींच्या चौकशीमध्ये पोलिसांना जी माहिती मिळाली त्या प्रमाणे काल पोलिसांनी कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅसची टाकी उघडली. तेव्हा त्यामधून अर्भकांच्या 11 कवट्या आणि 55 हाडे आढळून आली.
सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना पाचारण केले आहे. सध्या मिळालेल्या कवट्या आणि हाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. हेमंत पाटील यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here