गडचिरोली : पोलीस- नक्षल चकमक, जहाल महिला नक्षलीस कंठस्नान

1097

– विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) ३० सप्टेंबर : जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­या उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीतील कापेवंचा जंगल परिसरात २८ सप्टेंबर रोजी पोलिस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एका जहाल महिला नक्षलीस कंठस्नान घालण्यात विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. सदर महिला नक्षलीची ओळख अद्याप पटली नसून ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे ३० ते ४० नक्षली मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने २८ सप्टेंबर रोजी सकाळी एकत्र जमलेले असल्याबाबतच्या गोपनिय माहीतीवरुन कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास आधीच दबा धरून बसलेल्या ३० ते ४० नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी जवानांनी नक्षल्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले मात्र नक्षल्यांनी शरण न येता जवानांवर आणखी जोरदार हल्ला चढवला, जवांनानीही प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. दरम्यान जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध मोहीम राबविली असता घटनास्थळावर एका महिला नक्षलीचा मृतदेह मिळुन आला. तसेच मृतदेहासोबत ८ एमएम रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. महिला नक्षलीचा मृतदेह जिल्हा मुख्यालयात आणले असता सदर मृतदेह हे काळे-हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलीचा असून, तिची ओळख पटविणे सुरू आहे.
८ दिवसा अगोदरच ६ लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन नक्षल्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले होते यात एका महिला व एका पुरुष नक्षलीचा समावेश होता. चकमकीत महिला नक्षली ठार झाल्याने नक्षली चळवळीला हादरा बसला आहे.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या नक्षल्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे नक्षली विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन वारंवार पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो. करीत आहे.

आक्टोबर २०२० पासून ते आतापर्यंत एकुण ५५ नक्षली विविध चकमकीत ठार झाले असून, ४६ नक्षली अटक व १९ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे साो., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख साो. व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे साो. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो. यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

#gadchiroli #naxal #aheri #Gadchirolipolice #c-60 #ankit goyal # somay mundhe #anuj tare #samir shekh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here