The गडविश्व
गडचिरोली : येथील फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात निवड श्रेणी सहाय्यक अधिव्याख्याता पदी कार्यरत असणारे डॉ. दिलीप बारसागडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी मानव्यशास्त्र विद्याशाखेतील ‘समाजशास्त्र’ या विषयात आचार्य पदवी प्रदान केली आहे. डॉ. दिलीप बारसागडे यांनी याआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठामधून २०१३ ला समाजकार्य या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली होती.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी नुकतेच संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नोटीफिकेशन अनुसार डॉ. दिलीप बारसागडे यांनी सादर केलेल्या “अनुसूचित जाती उप-योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे समाजशास्त्रीय अध्ययन” या शोधप्रबंधासाठी त्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे. कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सदर शोधप्रबंध पूर्ण केला आहे.
डॉ. दिलीप बारसागडे हे ‘स्पर्श’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून ते उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांनी आतापर्यंत १२ पद्वुत्तर पदव्यांसह एकूण १५ विषयात पदवी प्राप्त केली आहे. समाजकार्य, समाजशास्त्र व इतिहास या तीन विषयांत त्यांनी नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. पाली व प्राकृत या विषयात पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी दोन सुवर्णपदक देखील मिळविले आहेत.
डॉ. दिलीप बारसागडे यांनी या आचार्य पदवीच्या विषयासाठी माजी सनदी अधिकारी व समाजकल्याण विभागाचे माजी संचालक ई. झेड. खोब्रागडे यांच्याकडून प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले आहे. डॉ. दिलीप बारसागडे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.