ज्ञान ही माणसाला स्वतःच्या गुरुचाही स्वामी बनवते : माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर

159

– गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा, विविध पुरस्काराचे वितरण
– मोहन हिराबाई हिरालाल यांना ‘जीवन साधना गौरव ‘पुरस्काराने सन्मानित

The गडविश्व
गडचिरोली, ३ ऑक्टोबर : शिक्षण ही एक संपत्ती आहे, शिक्षणाशिवाय माणूस हा जनावरासारखा आहे, शिक्षण माणसाला यशस्वी बनवते, त्याचे जीवन सुंदर बनवते. ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी माणसाला स्वतःच्या गुरुचाही स्वामी बनवते. असे शिक्षण आणि ज्ञानाचे गुण आहेत त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला इतके महत्त्व दिले असे प्रतिपादन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर यांनी केले. ते रविवार २ ऑक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

काल रविवार २ ऑक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा वर्धापन दिन विद्यापीठाच्या आवारात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते, प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली-चिमूरचे लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर , प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर म्हणले कि, गोंडवाना विद्यापीठ परिसरात वनसंपदा आणि संसाधनांचा खजिना आहे. या साधनसंपत्तीचा वापर करून विद्यार्थ्यांना या खजिन्यावर आधारित शिक्षण दिले तर हे विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ बनू शकेल. मानवी जीवनातील शिक्षणाचे मूल्य सांगून डॉ. निंबाळकर पुढे म्हणाले की, शिक्षण हा माणसाचा अलंकार आहे. माणसाला त्याच्या शिक्षणामुळे मान मिळतो. शिक्षण नसलेला माणूस हा सर्वात मागासलेला मानला जातो. माणूस संपत्तीने नव्हे तर शिक्षणाने ओळखला जातो. गडचिरोली जिल्ह्यातील विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीचा उल्लेख करून डॉ. निंबाळकर म्हणाले की, या साधनसंपत्तीचा वापर केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जंगल आणि त्यातील गुणधर्म या विषयावर शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून ते रोजगार शोधणारे नव्हे तर ते रोजगार देणारे होतील.
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. मोठे शास्त्रज्ञ हे त्यांचे आदर्श असावेत. त्यांनी स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नये. माणसाची ओळख त्याच्या जातीने किंवा धर्माने नव्हे तर त्याच्या शिक्षणाने झाली पाहिजे, असेही डॉ.निंबाळकर म्हणाले.

यावेळी प्रख्यात समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांना त्यांच्या समाजातील अतुलनीय सेवेबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठाच्या ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सत्कार प्रसंगी मोहन हिराबाई हिरालाल म्हणाले की, महात्मा गांधींनी सांगितलेली अहिंसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली समता ही दडपल्या गेलेल्या समाजाला पुढे नेण्यासाठी सहसंबंधित साधने आहेत. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. या दोन्ही नेत्यांना मानवतेच्या आधारे समाजात बदल हवा होता. हे विचार पुढे नेण्याची गरज आहे.

लेखामेंढा गावाचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला .दिल्ली मुंबईत आमच सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार घोषणा देऊन अमलात आणणारं लेखामेंढा गाव आहे. मला या गावापासून खूप शिकायला मिळाले. जगाला एक नवी वाट दाखवून देण्याचे काम हे गाव करीत आहे असे म्हणत समाजसेवक देवाजी तोफा यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले .

यावेळी खासदार अशोक नेते व आमदार डॉ.देवराव होळी यांनीही मार्गदर्शन करताना विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला बाहेरचे लोक मागास म्हणतात पण खरं पाहता हा सगळ्यात प्रगत असा भाग आहे आणि इथे समृद्ध असे जंगल आहे .एखादे बी पेरल्यानंतर त्याची फळे आणि फुले फळाला येतात तसेच विद्यापीठाचे फळे आता आपल्याला दिसायला लागतील. प्राध्यापकांनी अगदी तळागाळातल्या भागात संपर्क अभियान राबवले. त्याचंच फलित म्हणजे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे. काही महिन्यातच विद्यापीठात अनेक सकारात्मक बदल होऊन राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकीक होईल.

डॉ. शिल्पा आठवले यांनी मोहन हिराबाई हिरालाल यांच्या मानपत्राचे वाचन केले डॉ.श्रीराम कावळे यांनी प्रास्ताविक, डॉ.नरेंद्र आरेकर यांनी संचालन तर आभार डॉ.अनिल हिरेखान यांनी मानले.

विविध पुरस्कारांचे वितरण

गोविंदराव मुनघाटे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज कुरखेडा ला अंतर महाविद्यालयीन वार्षिकांक प्रथम पुरस्कार

महात्मा गांधी आर्ट्स, सायन्स अँड नसरुद्दीन भाई पंजवानी कॉमर्स कॉलेज, आरमोरी ला महाविद्यालयीन वार्षिकांक द्वितीय पुरस्कार

कर्मवीर महाविद्यालय, मूल ला महाविद्यालयीन वार्षिकांक तृतीय पुरस्कार

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर आणि नेवजाबाई हितकारिणी कॉलेज ब्रह्मपुरी ला महाविद्यालयीन वार्षिकांक प्रोत्साहनपर पुरस्कार

वाणिज्य विभाग पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम पुरस्कार अक्षदा अविनाश चडगुलवार, द्वितीय पुरस्कार रूपाली नरेश जेंगठे, तृतीय पुरस्कार प्रवीण प्रभाकर पोडीशेट्टी यांना.

उत्कृष्ट रासेयो महाविद्यालय एकक पुरस्कार

केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी विद्यापीठ स्तरीय
नीलकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती, चंद्रपूर जिल्हा
मोहसीन भाई जवेरी महाविद्यालय वडसा, गडचिरोली जिल्हा

उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कार डॉपवन नाईक , केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी विद्यापीठ स्तरीय
डॉ. गजेंद्र बेदेरे, निलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती, जि. चंद्रपूर
डॉ.चंद्रकांत शेंडे, मोहसीन भाई जवेरी महाविद्यालय वडसा, जि. गडचिरोली

उत्कृष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कार जानवी विजय पेद्दीवार , केवळ रामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी विद्यापीठ स्तरीय

राणी जितेंद्र गोंड सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर

उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर ,
उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉ. अमिर. ए. धम्मानी, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर ,
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ संलग्न महाविद्यालय) डॉ. श्रीराम गोविंद गहाणे, आदर्श आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज देसाईगंज( वडसा ) आणि डॉ. अपर्णा बापुजी धोटे, निळकंठराव शिंदे सायन्स अँनड आर्ट कॉलेज, भद्रावती जि.चंद्रपूर,
उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग३) मनिषा उत्तमराव फुलकर, (वर्ग ४) अनिल भोजा चव्हाण, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली,
उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ संलग्निक महाविद्यालये) प्रमोद नामदेवराव नागापुरे, आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन , वरोरा जि.चंद्रपूर उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विशाल मनोहर शिंडे, डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,चंद्रपूर
उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी पुरस्कार प्रियंका सोमेश्वर दिघोरे, नेवजाबाई हितकरणी महाविद्यालय, ब्रम्हपूरी जि. चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here