The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑक्टोबर : डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील नवनियुक्त कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी कृषि महाविद्यालय तसेच कृषि विज्ञान केंद्र, व कृषि संशोधन केंद्र,गडचिरोली येथे सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील विविध प्रात्यक्षिक प्रकल्पांची पाहणी केली तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र, गडचिरोली यांच्यासुद्धा कार्याचा आढावा घेतला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुरेंद्र कालबांडे, कुलसचिव, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला, डॉ. माया राऊत, सहयोगी अधिष्ठाता,कृषी महाविद्यालय, गडचिरोली, संदीप कऱ्हाळे, वरीष्ठ शात्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र,गडचिरोली तसेच सर्व कृषी महाविद्यालय,कृषी विज्ञान केंद्र,आणि कृषी संशोधन केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कुलगुरूंनी कृषी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ सदैव आपल्या पाठीशी उभा राहील असे आश्वासन दिले. याचप्रमाणे कृषि विज्ञान केंद्रामार्फत सर्व तालुक्यांना विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञानाचा फायदा झाला पाहीजे त्यादृष्टीने प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले. गडचिरोली हे अतिदुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्र असून येथील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वोपरी प्रयत्न करावे असे सांगितले. त्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषि तंत्रज्ञाचा वापर करून विशेष प्रयत्न करावे असे आवाहन उपस्थितांना केले. तंत्रज्ञाच्या प्रभावी अवलंबनासाठी एक तंत्रज्ञान एक गाव ही मोहीम राबवावी असे प्रतिपादन केले.
त्याचप्रमाणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ एस. आर. काळबांडे यांनी कृषि विज्ञान केंद्र गडचिरोली व कृषि महाविद्यालय गडचिरोली येथे सुरू असलेल्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यातही उत्तम कार्य करत राहावे असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ शांती पाटील यांनी केले तर आभार डॉ शुभांगी परशुरामकर यांनी मानले.