The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील पिटेसूर येथे गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत दारूविक्रेत्याची जिवंत हातभट्टी उध्वस्त केली आहे.
पिटेसूर गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा गाव संघटनेच्या महिलांनी निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने गावातील सर्व दारूविक्रेत्यांना सूचना देऊन तुमचा अवैध व्यवसाय तात्काळ थांबविण्याची सक्त सूचना देण्यात आली होती. मात्र, गावातील काही विक्रेते चोरट्या मार्गाने दारू गाळून विक्री करीत असल्याची बाब गाव संघटनेच्या लक्षात आली. त्यानुसार गावातील महिलांनी अहिंसक कृती करीत एका घराची तपासणी केली असता, संबंधित विक्रेता दारू गळताना दिसून आला. यावेळी महिलांनी चार लिटर मोहफुलाच्या दारूसह जिवंत हातभट्टी उध्वस्त केली. विशेष म्हणजे, संबंधित दारूविक्रेत्याकडून ५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला होता. तरीसुद्धा गाव संघटनेच्या निर्णयाला न जुमानता त्या विक्रेत्याने आपला अवैध धंदा सुरूच ठेवला होता. आता पुन्हा अवैध दारूविक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करू, असेही ठणकावून सांगण्यात आले आहे.