गडचिरोली : भ्रष्टाचारमुक्त भारत – विकसीत भारत ही संकल्पना घेवून आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ

416

The गडविश्व
गडचिरोली, ३१ ऑक्टोबर : भ्रष्टाचारमुक्त भारत–विकसीत भारत ही संकल्पना घेवून आज ३१ ऑक्टोबर पासून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताहाच्या अनुषंगाने आज ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली येथील कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासोबतच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमीत्य राष्ट्रीय एकता दिवस प्रतिज्ञा घेवून साजरा करण्यात आला.

आजपासून सुरु झालेला दक्षता जनजागृती सप्ताह ०६ नोव्हेंबर पर्यंत चालणार असून ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोली कार्यालयाचे वतीने भ्रष्टाचारमुक्त भारत – विकसीत भारत ही संकल्पना घेवून विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्वसामान्य नागरीकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. शासकीय लोकसेवक व त्यांच्या कुटूंबियांकरीता भ्रष्टाचार निर्मुलना संदर्भात चर्चासत्रे, व्याख्यान, कार्यशाळा तसेच विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उदा. मॅरेथान, वॉकेथान व पथनाटयाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच शहरी व तालुका क्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घोषवाक्ये असलेले पत्रके, भिंती पत्रके, बॅनर व पोस्टर वितरीत करुन भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जनजागृती सप्ताहाच्या निमीत्याने ग्रामसभेचे आयोजन करुन वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांचे भ्रष्टाचार जनजागृती संबंधी व्याख्यान ठेवण्यात आले आहे. समाजाला लागलेले भ्रष्टाचाराची किड थांबविण्यासाठी लाचेच्या मागणी विरुध्द ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोली कार्यालयास तक्रार नोंदवून यशस्वी सापळे रचून भ्रष्टाचारास आळा घालण्यास ज्या तक्रारदारांनी शासनास मदत केली, त्या सर्व धाडसी प्रवृत्तीच्या तक्रारकर्त्यांचे सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात येणार आहे.

सप्ताह दरम्यान सर्व शासकीय कार्यालयात काम करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परीषद, नगर परीषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि शासकीय मानधन घेणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर लोकसेवकांच्या भ्रष्टाचारासंबंधी आणि त्यांनी अवैध मार्गाने जमविलेल्या मालमत्तेबाबत काही माहिती असल्यास तसेच एखादया कामाकरीता एखादी व्यक्ती गैरमार्गाने पैशाची मागणी करीत असल्यास नागरीकांना टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करावे. तसेच कार्यालय पोलीस उपअधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोली येथील दूरध्वनी क्रमांक ०७१३२ / २९५०२० वर कळवावे किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येवून तक्रार करावी, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांनी केले आहे.

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या प्रारंभी आज स्थानिक इंदिरा गांधी चौक, टी-पाईंट गडचिरोली व ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव ता. जि. गडचिरोली या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी बॅनर लावून जनजागृती करण्यात आली.. तसेच स्थानिक सर्व कार्यालयात पोस्टर चिटकवून व नागरीकांना पत्रके वितरीत करून जनजागृती करण्यात आली. ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली कार्यालयात आज घेण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमास पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, पो.नि. श्रीधर भोसले, पोनि शिवाजी राठोड, सफ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर व मपोशि विद्या म्हशाखेत्री उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here