– दारू, खर्रा विक्रेत्यांवर होते दंडात्मक कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुलचेरा तालुक्यात गोविंदपूर हे गाव दारू व तंबाखू विक्रीबंदी साठी आदर्श गाव म्हणून नावाजलेले व इतर गावांनी आदर्श घ्यावा असेच आहे. तालुक्यातील गोविंदपूरवासियांच्या पुढाकारातून गावात दारू तर सोडाच पण, खर्रा विक्री सुद्धा होत नाही. जर दारू सेवन केल्यास गावकऱ्यांच्या वतीने दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते. एवढेच नव्हे तर, दारूचे व्यसन सोडणाऱ्यांचाही सत्कार केला जातो.
मुलचेरा तालुक्यामध्ये असलेल्या या गोविंदपुर गावात अनेक वर्षापासून कधीही दारू विक्री झालेली नाही. परंतु, या गावामध्ये खर्रा, तंबाखू, बिडी, सिगारेट मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. परिणामी लहान मुले, नवीन पिढी व्यसनाच्या आहारी जात होती. ही बाब लक्षात घेता गावातील प्रतिष्ठित लोकांनी गावामध्ये बैठक लावून त्यावर चर्चा केली व तंबाखूविक्री बंदी करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यामध्ये काही नियम, अटी सुद्धा लागू करण्यात आल्या. जसे की गावात कुणीही दारू विक्री करताना आढळल्यास 10 हजार रुपयांचा दंड, खर्रा विक्रेत्यांवर 5 हजार दंड, गावामध्ये कुणीही दारू पिऊन आढळल्यास त्याच्याकडूनही 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जातो. तसेच दंड केलेल्या दिवसापासून वर्षभर दारूच्या व्यसनातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीचा दंडाची रक्कम परत देऊन व 2 हजार बक्षिस, शाल, श्रीफळ देवून सत्कार करणे या निर्णयांचा समावेश आहे. मागील तीन ते चार वर्षापासून मुक्तिपथ तालुका चमू द्वारा गावातील या संघटनेला वारंवार भेट देणे, आवश्यक कायदेशीर माहिती देणे, सहकार्य करणे, गावात सामुहिक बैठक घेणे, जाणीवजागृती करणे, गावात विक्री बंदी टिकून राहावी यासाठी पाठपुरावा घेणे, इत्यादी कृती करून संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे.
गोविंदपूर गावाने फक्त निर्णयच न घेता अंमलबजावणी देखील केली आहे. आतापर्यंत दोन खर्रा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाही करण्यात आली. दोन दारू पिणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आणि एका दारू सोडणाऱ्या व्यक्तीचा झालेल्या निर्णयानुसार शाल, श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला. बैठकीत निर्णय घेऊन सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आजही या गावात दारू किंवा तंबाखूची विक्री होत नाही. गोविंदपूर गावाचा आदर्श घेऊन इतरही गावांनी दारू व तंबाखूमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. व्यसनमुक्तीमुळे गावाची विकासाकडे वाटचाल सुरु होईल.