The गडविश्व
गडचिरोली : प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते यामुळे सरकारने प्लास्टिक बंदी कायदा लागू केला. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासन, नगर परिषद आणि नगरपंचायतींना देण्यात आले. मात्र, गडचिरोली शहरात या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शहरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे.
राज्य सरकारने सहा वर्षांपूर्वी प्लास्टिक बंदी कायदा लागू केला. या कायद्यांतर्गत प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरुद्ध दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली. याशिवाय कायद्याची अंमलबजावणी करण्याची सूचनाही जिल्हा प्रशासन, नगरपरिषदा, नगर पंचायतींना देण्यात आल्या.प्लास्टिकबंदी कायदा लागू होताच गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायतींतर्फे प्लास्टिक निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत अनेक व्यावसायिकांकडून प्लास्टिक जप्त करून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र, काही महिन्यानंतर ही मोहीम पूर्णपणे – थंडबस्त्यात पडली आहे. त्यामुळे आता सर्वत्र प्लास्टिकचा सर्रासपणे वापर वाढला आहे. शहरातील रस्त्यांवरही प्लास्टिकचा कचरा दिसून येत आहे. काही नागरिक प्लास्टिक मध्ये अन्न टाकून देत असल्याने मोकाट जनावरे ते प्लास्टिकसह खात आहेत त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होत आहे. नगर प्रशासनाने याकडे लक्ष घालून कायद्याची अंमलबजावणी करण्याचे बोलले जात आहे.