सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई ठलाल यांचा प्रेरणादायी उपक्रम

308

– उत्स्फुर्तपणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दिवाळी अंकांची उत्सवपूर्वक सदिच्छा भेट
The गडविश्व
गडचिरोली, १८ नोव्हेंबर : जिल्ह्यातील कुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई ठलाल यांनी उत्स्फुर्तपणे एक अतिशय प्रेरणादायी उपक्रम राबविला. त्यांच्यामार्फत यंदाचे दिवाळी अंक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोठ्या उत्साहाने उत्सवपूर्वक सदिच्छा भेट करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुका मुख्यालयी स्थित सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगीताताई संतोष ठलाल यांच्या कविता व लेख सर्वंपरिचित असलेला दै.पुण्यनगरी, दै.देशोन्नती यांसारख्या बऱ्याच दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झाले. वाचकांना ते वाचता यावे यासाठी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिस निरीक्षक अष्टेकर यांना पि.एस.आय.शितल माने तसेच त्यांच्या कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीत दिवाळी अंक सदिच्छा भेट केले. तसेच कृषी कार्यालयात जाऊन रामटेके व त्यांच्या कर्मचारी वृंदाच्या समक्ष त्याचप्रमाणे शिवाजी हाॅयस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व मुख्याध्यापक आनंद गेडाम यांना त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीत उत्सवपूर्वक दिवाळी अंक सस्नेह भेट दिले. पुढे कुरखेडा येथीलच आदिवासी ग्रामीण विकास शिक्षणसंस्था श्रीराम विद्यालय तथा वाणिज्य महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बडवाईक यांना त्यांच्या सर्वं कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीत दिवाळी अंक सदिच्छा भेट देण्यात आले.
सदरच्या उपक्रमांतर्गत अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी उत्स्फुर्तपणे गेलेल्या कवयित्री संगीताताई ठलाल यांचे पुष्पगुच्छ व शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले. वाचन, लेखन व विचारमंथन करण्यास भाग पाडणाऱ्या त्यांच्या या महत्त्वाकांक्षी व प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा पण देण्यात आल्या. त्याचप्रमाणे दिवाळी अंक भेट दिल्याबद्दल त्यांचे सर्वांनी मिळून आभार व्यक्त केले. अशी माहिती श्री कृष्णकुमार निकोडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here