धान खरेदीची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा

304

– तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, ३० नोव्हेंबर : आरमोरी धान खरेदी केंद्रावर मागील तीन-चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. धान्य खरेदी केंद्रावर खोटे सातबारे दाखवून खोटे बिल बनवून शासनाच्या पैशाची अफरातफर करण्यात येत आहे. शासनाकडून हमालीचे पैसे मिळत असून सुद्धा धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून प्रत्येक क्विंटल मागे २५ रुपये शेतकऱ्यांकडून घेण्यात येत आहे हे घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी. धान खरेदी केंद्रावर ४० किलोच्या ऐवजी शेतकऱ्यांकडून ४२ किलो धान्य घेतले जात आहे. हे सुद्धा शेतकऱ्यांचे शोषण आहे. मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांकडून मापापेक्षा जास्त धान्य खरेदी करून सुद्धा धान्य खरेदी केंद्राला तूट कशी का येते याचा शोध घेतला तर सगळ्या घोटाळ्याची उकल होईल. यासाठी या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे ह्या प्रमुख मागणीसह तालुक्यातील ज्वलंत समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील नंदनवार, शहराध्यक्ष अमीन लालानी, शहर कार्याध्यक्ष प्रदीप हजारे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सदाशिव भांडेकर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा ज्योती सोनकुसरे, तालुका अध्यक्ष ज्योती घुटके, या पदाधिकाऱ्यांसोबत पुरुषोत्तम मैंद, रामचंद्र अलोने, लीलाधर धोटे, देवराव अलोने गोपाल अलोने, रामेश्वर कुमरे सदाशिव महाडोरे, मनोज दामले, रामभाऊ वाढई, जनार्दन भंडारे, देविदास महाडोरे, नक्टू भंडारे, नानाजी निकोडे, तुकडोजी लेनगुरे, नानाजी मोहुर्ले, शंकर वाढई, धर्मा वाढई, देवा निकोडे, इत्यादी शेतकरी सुद्धा उपस्थित होते
तालुक्यातील पाथरगोटा हे गाव पळसगाव गट ग्रामपंचायत मध्ये येत असून पाथरगोटा वासिय जनतेची अनेक वर्षापासून स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत अभावी गावातील विकास कामांना खिळ बसलेला आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे स्वतंत्र ग्रामपंचायत होण्यास विलंब होत आहे पाथरगोटा स्वतंत्र ग्रामपंचायतच्या निर्मितीसाठी कार्यवाही करावी. पाथरगोटा येथील जनतेला स्मशानभूमीची जागा अजून पर्यंत उपलब्ध झालेली नाही. गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कुठे करावा हा प्रश्न लोकांसमोर असल्याने पाथरगोटा येथे तात्काळ स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यात यावी. आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेती या जंगलाला लागून असून जंगलातील पशु शेतात घुसून शेतातील पिकांची नासाडी करतात. जंगलातील हिंस्त्र प्राण्यांमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपला जीव सुद्धा गमावावा लागला. या गंभीर प्रश्नावर प्रशासन कोणतेही उपाययोजना करीत नाही. शेतकऱ्यांना आणि शेतातील पिकाला संरक्षण मिळावे याकरिता जंगलालगत असणाऱ्या शेतीला सौर उर्जेवर संचालित होत असलेल्या करंट मशीन आणि कंपाऊंड तात्काळ देण्यात यावे. महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या मीटरची रिडींग न करता शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा एवरेज बिल पाठवित असतात त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सततची नापिकी होत असल्याने कृषी पंपाचे विज बिल माफ करण्यात यावे. गेल्या चार-पाच वर्षांपासून कृषी पंपासाठी डिमांड भरून सुद्धा शेतकऱ्यांना अजून पर्यंत वीज जोडणी करण्यात आलेली नाही. करिता कृषी पंपाची वीज जोडणी तात्काळ करून देण्यात यावी. शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. शेतावर जाण्यासाठी पूर्वीपासून प्रचलित असलेले पांदन रस्ते असतानाही त्याची तलाठी दप्तरी नोंद नाही अशा रस्त्यांना तलाठी दप्तरी नोंद करून त्या पांदन रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्यात येवून त्या पांदन रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्त्याचे काम सुरू करून शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्या करिता मार्ग करून देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
येत्या दहा दिवसाच्या आत समस्यांचे निराकरण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे.

(Armori) (Gadchiroli) (Dhany Kharedi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here