The गडविश्व
ता.प्र / सावली, ९ जानेवारी : तालुक्यातील मागील दोन तीन वर्षापासून मानव वन्यजीव संघर्ष होत आहे. कधी वाघाचे तर कधी रानडुक्कराचे हल्ले होतांना दिसते. दरम्यान तालुक्यातील कोंडेखल येथील महिला शेतात कापूस काढत असतांना रानटी डुकराने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवार ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. सौ. ललिताबाई सुखदेव कन्नमवार (४५) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ललिताबाई कन्नमवार ह्या कपिल झिंगुजी ठाकूर यांच्या शेतात कापूस काढत होत्या. यावेळी रानटी रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला असता डाव्या हाताला, छातीवर, कानावर व मांडीवर जबर मार बसल्याने त्या जखमी झाल्या. लागलीच त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. हाताला व कानाला मोठी जखम गंभीररीत्या जखमी झाल्याने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले.
घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वन विभागाचे कर्मचारी, वनरक्षक, मुंडे राउंड ऑफिसर, सूर्यवंशी, वन समिती अध्यक्ष कुमदेव सहारे, उपसरपंच नरेश बाबनवाडे, राकेश कंकडालवार, गणेश कन्नमवार, विजय जिगरवार व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. महीलेला लवकरात लवकर वनविभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील नागरिकाकडून करण्यात येत आहे. तालुक्यात वाघ, बिबट, रानडुक्कर यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, भयभीत झालेले आहे. त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
(The Gadvishva) (Chandrapur Gadchiroli News Updates)