– गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ
The गडविश्व
गडचिरोली, २६ जानेवारी : येथे असलेल्या गोंडवाना विद्यापीठात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या एका सभागृहास आर.एस. एस. चे नेते दत्ता डिडोळकर यांचे नाव देण्याचा विद्यापीठ सिनेटचा ठराव रद्द करावा व सदर सभागृहास थोर स्वातंत्र्य संग्राम सैनिक वीर शहीद बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध आदिवासी नेते तथा राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव कुलसंगे यांनी आज गुरुवार २६ जानेवारी दुपारी ०४.०० वाजता पासून गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात डिडोळकरांच्या नावाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून अनेक आदिवासी दलित व बहुजन समाजातील संघटनांनी हा ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीला संपूर्ण राज्यातून भरघोस पाठिंबा मिळत असून विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक संगठना, आमदार, खासदार यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील ज्येष्ठ आदिवासी नेते वसंत कुलसंगे यांनी आमरण उपोषणाला आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात केलेली आहे.
या उपोषणाला समाजातील विविध स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत असून येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. दरम्यान आपली मागणी पूर्ण होईपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका वसंतराव कुलसंगे यांनी घेतलेली आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Vassntrao Kulsange Gadchiroli) (Vir Baburao Shedmake) (Gondwana University) (Datta Digholkar)