१८ फेब्रुवारी पासून बेळगावमध्ये होणार पहिले बालनाट्य संमेलन

168

– सुबोध भावे, सई लोकूर यांची संमेलनासाठी खास उपस्थिती!!
The गडविश्व
मुंबई, ७ फेब्रुवारी : ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य संमेलनाला लाभले आहे. सदर संमेलनासाठी बेळगाव मधील २५ ते ३० शाळांमधील प्रत्येकी १५ मुले, याप्रमाणे एकूण ३०० मुलांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाला लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे, लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित, संमेलनाध्यक्षा माननीय मीना नाईक यांसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे बालरंगभूमी अभियान, मुंबईच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी कळविले आहे.
खूप पूर्वी बेळगावमध्ये असलेल्या दमदार नाट्य संस्कृतीला नव्याने तजेला आणण्यासाठी ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ संस्था प्रयत्नशील आहे. शनिवार १८ फेब्रुवारी रोजी दुपारी नाट्यदिंडीने संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. उद्घाटन समारंभ संपन्न झाला की बेळगावच्या कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाट्य शिबिरार्थींसाठी सादर करण्यात येतील. रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत बालरंगभूमी अभियानसाठी काम करणारे, मुंबई – पुण्यातील तज्ञ सदर तीनशे मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेतील. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेतून येणाऱ्या शिक्षक आणि पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रासाठी महाराष्ट्रातून राज्य नाट्य स्पर्धेला बक्षीस मिळवलेल्या तीन नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. संमेलन बेळगाव येथे घेण्यामागे आयोजकांचा बेळगावच्या मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये सभाधिटपणा यावा, हा उद्देश आहे. रविवारी संध्याकाळी संमेलनाची सांगता होणार आहे. बेळगाव सारख्या ठिकाणी मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, आणि ती तिथं टिकावी या साठी इथल्या अनेक संस्था प्रयत्न करीत असतात. मराठी कला संस्कृतीचं जतन व्हावं याकरिता विविध कार्यक्रमांचे संमेलनांचे अयोज़न केले जाते.
‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असून, संस्थेने आत्तापर्यंत बाल रंगभूमीच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. बालनाट्याचे विषय, सादरीकरण, इतर तांत्रिक बाबी कशा असाव्यात याच्याबद्दल संस्था आग्रही असून, संस्थेच्या सभासदांनी यासंदर्भात वेगवेगळ्या गावात जाऊन मोफत कार्यशाळा घेतली आहे. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या बाल राज्य नाट्य स्पर्धेमधील विषय आणि त्याची मांडणी कशी असावी, यासंदर्भातली एक कार्यशाळा शासनाच्या मदतीने संस्थेने घेतली आहे. मुंबई, महाराष्ट्रासह बेळगाव, कारवारमध्ये अनेक वर्ष ही संस्था सांस्कृतिक, नाट्य चळवळीचे’ विपुल कार्य करीत आहे. १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगाव ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करून ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ने एक डौलदार पाऊल पुढे टाकले आहे.
हे संमेलन या तीनशे मुलांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था संमेलन स्थळी करण्यात आलेली आहे. संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा माननीय मीना नाईक, ज्यांना नुकताच मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे, त्या स्वतः दोन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. बेळगावच्या प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बेळगावमधील नाटकातून केली आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वांचे लाडके आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बेळगावचे आणखीन एक प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Bard AI) (Aaron Finch) (Hogwarts Legacy) (Victoria Gowri) (Ravi Shastri) (Chelsea) (PSG) vs Toulouse)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here