The गडविश्व
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारताने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर घातलेले निर्बंध आणखी वाढवले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कोविड-19 च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीवरची बंदी आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत कायम राहणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही बंदी पुन्हा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर तो निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहक विमान सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. ‘डीजीसीए’नं मंजूर केलेल्या फ्लाइट्सनादेखील हा निर्णय लागू नसेल. यासोबतच ‘एअर बबल’अंतर्गत (Air Bubble) असलेल्या विमानवाहतुकीवर बंदी घालण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी ‘डीजीसीए’ने 31 जानेवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.