मार्कंडा यात्रेत सखी वन स्टॉप सेंटर योजनेची जनजागृती

142

The गडविश्व
गडचिरोली, २२ फेब्रुवारी : सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली ने विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव यात्रेदरम्यान जनजागृतीपर स्टॉल लावून सखी वन स्टॉप सेंटरची जनजागृती केली. गडचिरोली मार्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त सात दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले. येथील पुरातन शिवलींगाचे दर्शन घेण्याकीरता हजारो भाविक गर्दी करतात. त्याचे औचित्य साधून सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोलीच्या वतीने “एका छताखाली अनेक सेवा” देणाऱ्या महिलांसाठी तत्पर वन स्टॉप सेंटर या योजनेचे 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत माहितीपर तथा जनजागृतीपर स्टॉल लावून जनजागृती केली. केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास अंतर्गत येणारी सखी वन स्टॉप सेंटर ही एक पिडीत महिलांना आधार व एकाच छताखाली अनेक सेवा, सुविधा याप्रमाणे वैद्यकीय, समुपदेशन, कायदेशीर, पोलीस व निवास अशा सेवा, सुविधा देणारी एक महत्पपूर्ण व यशस्वी योजना आहे. सदर योजनेचे अनेक फायदे असले तरीही तुलनेने जनजागृती कमी आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक, कौंटुबिक किंवा इतर कोणत्याही हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार मिळावा व सदर योजनेचा लाभ मिळावा याकरीता जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. जनजागृतीच्या अनुषंगाने सखी वन स्टॉप सेंटर स्टॉल अंतर्गत विविध महिला व नागरीकांना योजनेची माहिती देण्यात आली. आपल्या आसपास पीडीत महिला आढळल्यास 181, 1098 तथा जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटरला संपर्क करण्याचे आवहन करण्यात आले. त्याप्रमाणे सामान्य नागरीक तथा महिलांनी मोठ्या संख्येने स्टॉलला भेट देवून या योजनेची माहिती जाणून घेतली व अशी पीडीत महिला आढळल्यास सखी वन स्टॉप सेंटरला अवगत करुन सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सखी वन स्टॉप सेंटरच्या 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 या तीन दिवसीय मार्कंडा येथील जनजागृतीपर स्टॉल / कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक तथा इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले. असे केंद्र प्रशासक, केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here