कोदो कुटकी राळा, मधूमेह टाळा : चोप येथे पौष्टीक तृणधान्याविषयी जनजागृती

267

The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २७ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष सन २०२३ अंतर्गत वडसा तालुक्यातील चोप येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय वडसा यांच्या पुढाकाराने व जिल्हा परीषद कन्या शाळा चोप यांच्या सहकार्याने रॅली काढून पौष्टीक तृणधान्याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी कोदो कुटकी राळा, मधूमेह टाळा अशी घोषवाक्य देण्यात आली.
भारत सरकारने वर्ष २०१८ हे राष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले आणी आता २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्याचे निश्चीत केले आहे. यामध्ये भरडधान्य, तृणधान्य ही लोक चळवळ व्हावी, नागरीकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, भारत हे तृणधान्याचे जागतिक केंद्र व्हावे हे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार पौष्टीक तृणधान्य क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे. पोष्टीक तृणधान्याची मुल्यवर्धीत उत्पादने तयार करणे, पौष्टीक तृणधान्यांचा लोकांच्या आहारातील वापर वाढवणे. त्याचे आहार व आरोग्य विषयक महत्व प्रचार प्रसार करणे. उत्पादन व आहारातील वापर वाढीसाठी विवीध उपक्रम राबविणे. पौष्टीक तृणधान्य निर्यातीस चालना देणे हे उद्देश ठेवण्यात आले आहेत. या तृणधान्य पिकांची वैशीष्ट्ये म्हणजे ही पिके कमी कालावधीत येतात. कोरडवाहू क्षेत्रावर हलक्या जमिनीत, कमी पाण्यावर येतात. कमी खर्च व कमी साधन सामग्रीमध्ये घेता येतात. ही पिक हवामान बदलास अनुकूल, प्रतिकूल परीस्थीतीत तग धरतात आणी महत्वाचे म्हणजे ती पोषक मुल्य व आरोग्यवर्धक गुणांनी संपन्न आहेत. त्यांच्यातील कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे सेवनानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. कॅल्शीयमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत होतात. तंतूमय पदार्थ भरपूर असल्याने पचनक्रीया सुधारते. खनिजे व जिवनसत्वे भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्तदाब व हृदयरोग प्रतिबंध करण्यास व दमा सारख्या श्वसन रोगावर गुणकारी आहेत.
या तृणधान्य पिकामधील ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कोडो / कोद्रा या पिकांचा समावेश आपल्या आहारात करुन तृणधान्य उत्पादन वाढीसाठी व कुटुंबाच्या पौष्टीक आहारासाठी हातभार लावावा, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाची प्रचार प्रसीध्दी करण्यासाठी व तृणधान्य पिकांचे महत्व पटवून देण्यासाठी सी.जी. ताडपल्लीवार कृषि पर्यवेक्षक वडसा, वाय. एच. बोरकर कृषि सहाय्यक चोप, एस. डी. कोहळे कृषि सहाय्यक कोकडी, दहीकर सर, धकाते मॅडम जि.प. कन्या शाळा चोप व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here