कुरखेडा : कुंभीटोला येथील गौण खनिज प्रकरण तापले, नागरिकांनी उगारले उपोषणाचे शस्त्र

1300

– सतत कारवाईची मागणी करूनही पूर्तता न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी उचलले पाऊल
The गडविश्व
कुरखेडा, ११ मार्च : तालुक्यातील कुंभीटोला येथील गौण खनिज प्रकरणाला आता नवे वळण आले असून प्रकरण तापल्याचे दिसते आहे. सतत कारवाईची मागणी करूनही कोणतीही पूर्तता न झाल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी उपोषणाचे शस्त्र हाती घेत आता स्थानिक प्रशासनाविरुद्ध उगारून १३ मार्च २०२३ पासून कुरखेडा तहसील कार्यलयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार घेतला आहे.
गावकऱ्यांच्या सततच्या मागणीला केराची टोपली दाखवत डोळेझाक केल्याने एकंदरीत कुंभीटोला येथील गौण खनिज प्रकरण आता तापल्याचे दिसून येत असून याचा सूर राज्याच्या विधिमंडळात उमटण्याची सुद्धा शक्यता आहे.
तालुक्यातील कुंभीटोला या गावाच्या ५०० मीटर परिसरात विटा भट्टी लावल्याने विटा भट्टी मधील राखड हवेने गावात उडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, गाव महसूल दप्तरी पूरग्रस्त नोंद असून दरवर्षी पुराचा फटका या गावाला बसत असतो. गावाच्या नजीक असलेल्या सती नदीपासून अगदी जवळच मोठ्या प्रमाणात विटाभट्टीसाठी अवैध माती उत्खनन केले जाते. सदर उत्खनन केल्यामुळे नदीचा प्रवाह बदलून गावाकडे वाढण्याची दाट शक्यता असून गावाच्या अस्तित्वास धोका निर्माण होवून भविष्यात मोठे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे गावालगत व नदी किनारी सुरू असलेल्या विटा भट्टी गावापासून व नदी किनाऱ्या पासून ५०० मीटर दूर अंतरावर करण्यासाठी निर्बंध घालण्याकरीता तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना १६ जानेवारीला २०२३ ला गावकऱ्यांनी निवेदन सादर केले होते. मात्र सदर निवेदनाची महिना उलटूनही कोणतीही दखल न घेता सदर मागणीकडे डोळेझाक केली व सदर प्रकरण चिंगारी घेत असतांना व प्रकरण आपल्याच अलगट येतांना पाहून १ मार्च २०२३ ला ग्रामपंचायत कुंभीटोला कार्यालयास २० फेब्रुवारी २०२३ रोजी चा जाहीरनामा तर ०१ मार्च २०२३ चा जाहीरनामा ०९ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध करून महसूल विभागाने मात्र हुशारकी मारण्याचा प्रयत्न करून प्रकरणातून निसटण्याचा केवीलवाणा प्रकार केला. मुदत बाह्य जाहीरनामा प्रसिध्द करून गावकऱ्यांना आक्षेप नोंदविण्या पासून रोखण्याचा व अवैध विटा धारकांना भट्ट्या लावून नंतर परवानग्या देण्याचा प्रकार प्रशासनिक स्तरावरून होत असल्याचे नागरिकांच्या लगेच लक्षात येताच पुन्हा हे प्रकरण नागरिकांनी उचलून धरले. त्याच प्रमाणे कुंभीटोला नदी पत्रातून अवैध रेती उपसा होत असल्याची तक्रार २७ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना निवेदनातून सादर करूनही अद्याप कुठील्याही प्रकारची साधी चौकशी ही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता स्थानिक प्रशासनाविरुद्ध उपोषणाचे शस्त्र उगारुन कुरखेडा तहसील कार्यलयासमोर सोमवार १३ मार्च पासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार घेतला आहे. एकंदरीत सदर प्रकरणाने नवे वळण घेतले असून याचे सूर राज्याच्या विधिमंडळात उमटण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. सदर प्रकरणाबाबत विधिमंडळात सूर उमटण्यास व त्यानुसार योग्य ती चौकशी होऊन कारवाई झाल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सदर प्रकरणाकडे तालुकावासीय तसेच जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहेत.

उपोषण स्थगित करण्याची विनवणी

सदर प्रकरणाबाबत उपोषणाला बसण्याच्या परवानगीचे पत्र तहसील कार्यालयाला प्राप्त होताच तात्काळ संबंधित प्रणाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल याकरिता कमीत कमी ७ दिवसांचा अवधी लागत असल्याने तूर्तास उपोषणाला बसू नये अशी विनवणी पत्र तहसील कार्यलयामार्फत उपोषणकर्त्यांना प्राप्त झाल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here