– आरोग्य प्रशासन सतर्क
The गडविश्व
नवी दिल्ली, ११ मार्च : भारतीयांना पुन्हा मास्क वापरण्याची वेळ आली असून भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली असल्याची बाब पुढे येत आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे कळते. तर H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR ने हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत.
Influenza A subtype H3N2 is the major cause of current respiratory illness. ICMR-DHR established pan respiratory virus surveillance across 30 VRDLs. Surveillance dashboard is accessible at https://t.co/Rx3eKefgFf@mansukhmandviya @DrBharatippawar @MoHFW_INDIA @DeptHealthRes pic.twitter.com/3ciCgsxFh0
— ICMR (@ICMRDELHI) March 3, 2023
मास्क वापरण्याचे आवाहन
H3N2 इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावे असे देखील सांगितले आहे.
असा पसरतो इन्फ्लुएंझा विषाणू
सध्या कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही बेजार झाली आहेत. औषधे घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळताना दिसत नाही. हा व्हायरल संसर्ग H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होत आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू H1N1 इन्फ्लूएंझा विषाणूचा उपप्रकार म्हणजेच बदललेले स्वरुप आहे.
देशात व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणू (Coronavirus) प्रमाणे आता H3N2 विषाणू तांडव करणार की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचा सल्ला देत मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
H3N2 विषाणू संसर्गाची लक्षणे
H3N2 इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू आहे. याची लक्षणे कोरोना प्रमाणेच आहेत. ताप, खोकला आणि वाहणारे नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.
H3N2 व्हायरसपासून संरक्षण कसे कराल?
H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. IMA ने संक्रमित व्यक्तीला अँटीबायोटिक घेणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
फ्लूवरील वार्षिक लस घ्या.
हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा.शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.आजारी व्यक्तींपासून दूर राहा.