गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून शेळीपालन व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना निरोप

151

– शेळीपालनचे ३४ व सॉफ्ट टॉईजचे २७ प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण
The गडविश्व
गडचिरोली, १७ मार्च : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातून, गडचिरोली जिल्हयातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे मागदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना गडचिरोली पोलीस दल व बिओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने इच्छुक युवक-युवतींना शेळीपालन व सॉफ्ट टॉईजचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सदरचे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम १७ मार्च २०२३ रोजी बिओआय आरसेटी कार्यालयात पार पडला.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने शेळीपालन प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली येथील ३४ महिला- पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ०५ पुरुष व २९ महिला प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता. ०८ ते १७ मार्च २०२३ पर्यंत एकुण १० दिवसाच्या या प्रशिक्षणात तज्ञांच्या मार्फतीने शेळयांच्या जाती, चारा व्यवस्थापन व लसीकरण संदर्भात प्रशिक्षण व उद्बोधन करून, शेळीपालन व्यवसाय उभारणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सॉफ्ट टॉईज प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली, धानोरा, कुरखेडा व सिरोंचा येथील २७ महिला-पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये २१ पुरुष व ०६ महिला प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता. ०८ ते १७ मार्च २०२३ पर्यंत एकूण १० दिवसाच्या प्रशिक्षणात सॉफ्ट टाईज बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करतांना अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. यांनी सांगीतले की, प्रशिक्षणार्थ्यांना स्वतःच्या पायावर व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा दिली व या प्रशिक्षणानंतर तुम्हाला ही संधी प्राप्त झाल्याचे सांगीतले. तसेच उत्कृष्ट हस्तकला तयार करणाऱ्या हस्तकलागारांच्या वस्तु ई-प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करुन देणेबाबत गडचिरोली पोलीस दलाने सुरु केलेल्या “प्रोजेक्ट उत्थान” विषयी मार्गदर्शन केले. असे सांगून शेळी पालन व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सहलीचे आयोजन व तसेच बेरोजगार युवक-युवतींना ब्युटीपार्लर १७४, कुक्कुटपालन ५६६, बदक पालन १००, शेळीपालन १४९, शिवणकला २४९, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड १३९५, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण १०६२, दु व्हिलर दुरुस्ती ९९, मत्स्यपालन ८७, फास्ट फुड ९६, पापड लोणचे ५९, टू/ फोर व्हिलर प्रशिक्षण ५०२, एमएससीआयटी २००, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ४८९६ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. यांचे उपस्थितीत पार पडला. यावेळी कैलास बोलगमवार, संचालक, हेमंत मेश्राम, कार्यक्रम समन्वयक, पुरुषोत्तम कुनघाडकर, कार्यक्रम समन्वयक, गीता मेडपीलवार तज्ञ मार्गदर्शिका सर्व बीओआय आरसेटी, गडचिरोली हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभाग तसेच पोस्टे / उपपोस्टे / पोमकेंचे सर्व अधिकारी/अंमलदार, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here