गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व पाणी पुरवठा करा

123

– अन्यथा छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात २४ तारखेला चक्काजाम आंदोलन
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २१ मार्च : विद्यमान सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विरोधात असताना मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर २४ तास मोफत वीजपुरवठा करण्याचे सुतोवाच केले होते. त्याच मागणीला घेऊन स्थानिक आमदारांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून आमचे सरकार आल्यास २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणे सुरु केले असल्याने येथील शेतकरी पुरते बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व पाणी पुरवठा करा, अन्यथा विरोधात सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात २४ मार्च २०२३ ला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर घेराव व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता घनश्याम सारवे यांच्या तर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
सन २०२२-२३ मध्ये खरीप हंगामातील धान पिक अतिवृष्टीमुळे पुर्णता नष्ट झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सावकाराकडुन व बँकेकडून घेतलेले कर्ज फेडणे कठिण होऊ लागल्याने तो खर्च भरून काढुन घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली आहे.
दरम्यान कृषी पंपाना ८ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने धान पिक धोक्यात आले होते. ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी २४ तास सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणीला घेऊन शंकरपुर स्थित महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर जेलभरो आंदोलन करताच १२ तास वीज पुरवठा करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला जो की महाविकास आघाडीच्या काळातच निर्णय घेऊन वीजपुरवठा करण्यात येत होता.
वस्तुतः विद्यमान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस विरोधी पक्ष नेते असताना मध्यप्रदेशच्या धर्तीवर २४ तास मोफत वीज पुरवठ्यासाठी आग्रही होते. एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन करून विधानसभेचे कामकाज देखील बंद पाडले होते. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक आमदारांनी महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन करून आमचे सरकार आल्यास २४ तास मोफत वीज पुरवठा करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासीत केले होते. मात्र सत्तेत येताच कधी ८ तास तर कधी १२ तास वीज पुरवठा करण्याचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळत सुटले आहेत. हे अन्यायकारक असुन यामुळे येथील शेतकरी पुरते बरबाद होऊन भिकेला लागण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना नुसते आश्वासन नको तर २४ तास मोफत वीज व पाणी पुरवठा करा,अन्यथा २४ मार्च २०२३ रोजी ११ वाजता देसाईगंज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव घालून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
निवेदन देसाईगंज वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता घनश्याम सारवे यांनी स्विकारले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदु नरोटे, पिंकु बावणे, मनोज ढोरे, विलास ढोरे, गोपाल दिघोरे, अभय बुद्धे, महेश भरणे, पदमा कोडापे, पुष्पा कोहपरे आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here