पांढऱ्या रंगाचा प्रत्येक साप हा ‘अल्बिनो’ च नसतो

1141
संग्रहित छायाचित्र

– वन्यजीवप्रेमी तथा सर्पमित्र अजय कुकडकर यांची माहिती
– गडचिरोली जिल्ह्यात २०१७ साली पहिल्यांदा आढळला पांढरा नाग
The गडविश्व
गडचिरोली, २५ मार्च : जिल्ह्यातील दक्षिण भागात नुकताच ‘अल्बिनो’ म्हणजेच पांढऱ्या रंगाचा नाग आढळल्याची घटना पुढे आली. तो साप दुर्मिळ असून क्वचितच आढळून येत असतो.तसेच पांढऱ्या रंगाचा प्रत्येक साप हा ‘अल्बिनो’ च असतो असे नाही असे मत गडचिरोलीचे वन्यजीव प्राणी मित्र तथा सर्पमित्र अजय कुकडकर यांनी व्यक्त केले आहे.
कुकडकर यांनी सांगितल्यानुसार, हा साप अल्बिनो या दुर्मिळ विकाराने ग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. परंतु प्रत्येक पांढरा दिसणारा साप हा अल्बिनोच असू शकते असे नाही. कारण अल्बिनो ग्रस्त साप क्वचितच आढळून येतात. पांढरे दिसणारे प्राणी हे बरेचदा ल्युसिझम या सामान्य आजाराने ग्रस्त असू शकतात. जिल्ह्यात पांढरा नाग आढळल्याची नोंद यापूर्वीही झालेली आहे. तर जिल्ह्यातील सर्पमित्रांनी पहिल्यांदा पांढरा नाग गडचिरोली शहरानजीकच्या कोटगल येथील ट्रीट आईसक्रीम फॅक्टरी मधे २०१७ साली पकडला होता. तर आता नुकताच काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दक्षिण भागात साप आढळला.
पांढऱ्या रंगाचे साप अल्बिनिझम (albino) किव्हा ल्युसिझम (leucistic) यापैकी एका अनुवांशिक विकाराने ग्रस्त असू शकतात.

संग्रहित छायाचित्र

काय असते ल्युसिझम आणि अल्बिनो ?

ल्युसिझम हे केवळ रंगद्रव्याचे आंशिक नुकसान आहे. ज्यामुळे प्राण्याची त्वचा, केस किंवा पंख पांढरे किंवा फिकट रंगाचे होऊ शकतात. तथापि, डोळ्यातील रंगद्रव्य पेशी या स्थितीमुळे प्रभावित होत नाहीत.
अल्बिनिझम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेलेनिनची अनुपस्थिती असते. मेलेनिन हे त्वचेमध्ये असते आणि ते त्वचेला, पंखांना, केसांना आणि डोळ्यांना रंग देते. अल्बिनिझम असलेले पृष्ठवंशी केवळ पांढरे (किंवा कधीकधी फिकट पिवळसर) रंगाचे नसतात तर त्यांचे डोळे खूप फिकट गुलाबी किंवा लाल असतात. जसे रक्तवाहिन्यांमधून दिसतात. अल्बिनिझम अत्यंत दुर्मिळ आहे तर ल्युसिझम जास्त सामान्य आहे.

ज्या प्राण्यांचा रंग पांढरा असतो त्यांना अनेकदा ल्युसिझम असतो मात्र त्यांना अल्बिनिझम असल्याचे समजले जाते.
ल्युसिझम असलेल्या प्राण्यांना ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे डोळे पाहणे. ल्युसिझम असलेल्या प्राण्यांचे डोळे लाल किंव्हा गुलाबी ऐवजी गडद रंगाचे असतात.
अल्बिनो आणि ल्युसिझम या दोन अतिशय भिन्न परिस्थिती आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला अल्बिनो वाटणारा प्राणी दिसला की तो बहुतेक पांढरा आहे का ते पहा आणि महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांकडे एक नजर टाका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here